मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमात महाराणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या 'घूमर' डान्समध्ये मोठा बदल केला आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.

ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते दृश्य राणी पद्मावतीच्या प्रतिमेच्या विरोधी आहे. त्यामुळे या गाण्यात आवश्यक बदल करण्यास सांगितलं आहे.

सेन्सॉर बोर्डासमोर जेव्हा सिनेमाची स्क्रीनिंग करण्यात आली, तेव्हा गाण्यात बदल करण्याची सूचना बोर्डाने केली होती. 'घूमर' गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकांची कंबर दिसत आहे, ती दृश्य हटवण्याची सूचना सीबीएफसीच्या विशेष समितीने निर्मात्यांना केली आहे.

मात्र अशाप्रकारच्या एडिटिंगमुळे गाण्याची कोरिओग्राफी बिघडेल. त्यामुळे दीपिकाची कंबर ग्राफिक्सद्वारे लपवण्यासाठी दिग्दर्शक भन्साळी तयार झाले.

सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले आवश्यक बदल केल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाची अंतिम कॉपी जमा करुन घेतली आहे. पण बोर्डाने 'पद्मावत'ला अद्याप प्रमाणपत्र दिलेलं नाही.

सुरुवातीला सिनेमात 300 कट सुचवल्याचं म्हटलं जात होतं. पण बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या वृत्ताचा इन्कार केला. निर्मात्यांनी पाच बदलांसह शेवटची कॉपी जमा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.