संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने जितकं मानधन घेतलं होतं, त्यापेक्षाही यंदा सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी तिने अधिक पेमेंट घेतल्याची चर्चा आहे. पद्मावतने जगभरात सहाशे कोटींच्या वर कमाई केली होती. हा दीपिकाचा सर्वाधिक गल्ला जमवणारा सिनेमा ठरला होता.
हा चित्रपट 1983 साली विश्वविजेत्या ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघावर आधारित आहे. म्हणजेच कपिल देव यांच्या व्यावसायिक आयुष्याचा भाग असलेल्या या सिनेमात त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि पत्नीची व्यक्तिरेखा कितपत दाखवली जाईल, यावर शंका आहे. त्यामुळे दीपिकाने घेतलेल्या अव्वाच्या सव्वा मानधनामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
'83' सिनेमातील दीपिकाच्या सहभागाबद्दल रणवीरसह इतर कलाकार आणि दिग्दर्शक कबीर खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली. 'या सिनेमाच्या अखेरीस आम्ही मरणार नाही. ये!' असं मिष्किल कॅप्शन रणवीरने दिलं आहे. यापूर्वी गोलीयों की रासलीला - रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत या रणवीर-दीपिकाने एकत्रित केलेल्या तिन्ही चित्रपटात दोघांच्या किंवा कोणा एकाने साकारलेल्या पात्राचा मृत्यू दाखवला आहे.
या सिनेमात दीपिका सहाय्यक व्यक्तिरेखा साकारण्याबद्दल साशंक होती. मात्र रणवीर आणि चेकवरील आकड्यांनी तिची समजूत घातल्याचं तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलं. दीपिका मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' या अॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दीपिकाने गेल्या वर्षात जाहिराती, इव्हेंट आणि चित्रपटांतून 112 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 'फोर्ब्स' मासिकाच्या टॉप 100 भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ती अव्वल दहामध्ये झळकलेली एकमेव महिला होती.
83 चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील हे मराठमोळे चेहरेही झळकणार आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी, साकिब सालेम, ताहिर राज भसीन, अॅमी वर्क, हार्डी संधू, जीवा यासारखे कलाकार भारतीय संघातील विविध क्रिकेटपटूंच्या भूमिका साकारणार आहेत.