मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे बॉलिवूडमधलं हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. रणवीर आणि दिपिकाच्या लग्नाची तारीख ठरली आहे. दीपिका आणि रणवीर दोघांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंवर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.
येत्या 14 नोव्हेंबरला दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत, तर 15 तारखेला रिसेप्शन होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या तारखांविषयी अंदाज लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना आणि अंदाजांना आता पूर्णविराम लागला आहे.
दीपिका आणि रणवीरने लग्न पत्रिका शेअर करताना लिहिलं की, "आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आमचा शुभ विवाह 14 आणि 15 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तसेच आम्ही सुरू करत असलेल्या प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या या सुंदर प्रवासामध्ये तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहील अशी आशा करतो."