मुंबई : मूल दत्तक घेणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत अभिनेत्री साक्षी तन्वरचाही समावेश झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी साक्षीने मुलगी दत्तक घेतली असून तिचं 'दित्या' असं नामकरण केलं आहे.
'आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंब-मित्र परिवाराच्या पाठिंब्याने मी एक मुलगी दत्तक घेतली आहे. तिचं नाव 'दित्या' असून ती नऊ महिन्यांची होईल' अशी माहिती 45 वर्षीय साक्षीने दिली. दित्या हे लक्ष्मी देवीचं नाव आहे.
साक्षीने 2000 साली 'कहानी घर घर की' मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने साकारलेली 'पार्वती' ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर साक्षीने देवी, बालिका वधू, बडे अच्छे लगते है यासारख्या मालिकांमध्येही काम केलं.
कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटात साक्षीने साकारलेली भूमिका वाहवा मिळवून गेली. त्याचसोबत आमीर खानसोबत दंगलमध्ये ती झळकली. सनी देओल सोबत तिचा मोहल्ला असी हा सिनेमात अद्याप रिलीज झालेला नाही.
सुष्मिता सेन ही दोन दत्तक मुलींची सिंगल मदर आहे. तर सनी लिओन, रविना टंडन, निलीमा कोठारी या अभिनेत्रींनी लग्नानंतर मूल दत्तक घेतलं आहे.