मुंबई : बॉलिवूडचं हिट आणि हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग येत्या नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याचवेळी दीपिका आणि एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूर यांच्या गुप्त भेटी होत असल्याचंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. दीपिका-रणबीर पॅचअप करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दीपिकाने दिलेली एक मुलाखत या मीडिया रिपोर्ट्सना सणसणीत उत्तर ठरत आहे.
साधारण 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची भेट झाली होती. 2008 साली 'बचना ऐ हसिनो'च्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र एके दिवशी दीपिकाने बॉयफ्रेण्डला एका तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं आणि नात्याची घडी विस्कटली.
ब्रेकअपनंतर काही महिन्यांनी एका आघाडीच्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. रणबीरचं नाव घेणं दीपिकाने टाळलं असलं, तरी हे ओपन सिक्रेट आहे.
'माझ्यासाठी सेक्स म्हणजे केवळ दोन शरीरांचं मीलन नाही. त्यामध्ये भावनाही गुंतलेल्या असतात. रिलेशनशीपमध्ये असताना मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही. जर मला चीट करायचं असेल, तर रिलेशनशीपमध्ये कशाला अडकावं? त्यापेक्षा सिंगल राहून मजा करावी. पण प्रत्येक जण हा विचार करत नाही. म्हणूनच कदाचित मी जास्त दुखावले गेले. त्याने गयावया केली, तेव्हा त्याला दुसरी संधी देण्याचा मूर्खपणा मी केला. माझे मित्र मला सांगत होते, की तू तुला फसवतोय. पण एके दिवशी मी त्याला रंगेहाथ पकडलं. मला यातून बाहेर पडायला वेळ लागला. परतीचे मार्ग बंद होते.' असं दीपिका म्हणाली होती.
'त्याने पहिल्यांदा मला फसवलं, तेव्हा मला वाटलं होतं की आमच्या नात्यात किंबहुना माझंच काहीतरी चुकतंय. पण त्याला याची सवय जडली, तसं मला समजलं की त्याचाच दोष आहे. मी आमच्या नात्याला खूप काही दिलं, आणि विशेष म्हणजे मोबदल्यात कसलीच अपेक्षा केली नाही. पण व्यभिचाराने हे नातं तोडलं. एकदा नात्यात फसवाफसवी आली, की नात्याचे आधारस्तंभ असलेले आदर, विश्वास निघून जातात.' असंही दीपिकाने सांगितलं होतं.
'ब्रेकअप माझ्यासाठी कठीण होतं. एखाद्या गोष्टीशी किंवा व्यक्तीशी जास्त अटॅच होऊ नये, याची मला जाणीव झाली. मी ब्रेकअपनंतर खूप रडले. पण व्यक्ती म्हणून माझा विकास झाला, त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवे' असं दीपिका म्हणते. एकूणच दीपिका रणबीरसोबत पुन्हा पॅचअप करण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.
दीपिकासोबत ब्रेकअपनंतर रणबीर आणि कतरिना कैफ यांचं सूत जुळलं. मात्र काही महिन्यातच दोघांनीही एकमेकांना अलविदा केला. सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट डेट करत आहेत. तर दीपिका आणि रणवीर सिंग सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.
माझ्या बॉयफ्रेण्डला 'तिच्या'सोबत रंगेहाथ पकडलं होतं : दीपिका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2018 12:18 PM (IST)
दीपिका-रणबीर पॅचअप करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दीपिकाने दिलेली एक मुलाखत या मीडिया रिपोर्ट्सना सणसणीत उत्तर ठरत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -