‘पद्मावत’च्या रिलीजआधी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2018 10:58 PM (IST)
‘पद्मावती’ची भूमिका साकरलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण आज (मंगळवार) सिद्धिविनायक चरणी लीन झाली
मुंबई : ‘पद्मावती’ची भूमिका साकरलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण आज (मंगळवार) सिद्धिविनायक चरणी लीन झाली. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दीपिकानं गणपतीचं दर्शन घेतलं आणि 'पद्मावत' चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित व्हावा अशी प्रार्थना केली. यावेळी सिद्धिविनायक मंदिराबाहेर दीपिकाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सध्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन मोठा वाद सुरु आहे. सुप्रीम कोर्टानं देशभर चित्रपट प्रदर्शित करु देण्याचे आदेश दिले आहेत, तर करणी सेनेनं हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग खडतर होताना दिसत आहे. दरम्यान, आपले सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिका आवर्जून सिद्धिविनायकाचं दर्शन घेते. 2015 साली रिलीज झालेल्या 'तमाशा' आणि 'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या वेळीही ती सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाली होती.