मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडमधलं हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर इटलीमध्ये लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे.


आतापर्यंत दीपिका आणि रणवीर या दोघांनी आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळलं असलं, तरीही चाहत्यांनी दोघांचं शुभमंगल होणार, ही अटकळ बांधली आहे. 20 नोव्हेंबर 2018 च्या मुहूर्तावर दीपिका-रणवीर लग्न करणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या पावलावर पाऊल टाकत दीपिका आणि रणवीरही इटलीमध्येच विवाहबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इटली हे दोघांचं फेवरेट डेस्टिनेशन असल्यामुळे मिलानमधील लेक कोमोजवळ दोघं लगीनगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातं.
दीपिका-रणवीरचं विराट-अनुष्काच्या पावलावर पाऊल

विशेष म्हणजे, रणवीर-दीपिकाच्या लग्नातील पाहुण्यांची संख्याही आटोपशीर असेल. अवघ्या 30 जणांना रणवीर-दीपिकाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यात येणार आहे.

आतापर्यंत दीपिका-रणवीर यांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा चाहत्यांनी चवीने चघळल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

काही महिन्यांपूर्वी वांद्र्यात दीपिका आईसोबत दागिने खरेदी करताना दिसली होती. त्यामुळे ही लग्नाची खरेदी असल्याच्या चर्चा 'बी टाऊन'मध्ये रंगल्या.

'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान यश कमावलं आहेच, शिवाय त्यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं आहे.