मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' अर्थात 'डीडीएलजे' गेली 22 वर्ष नियमितपणे झळकत आहे. इतक्या वर्षांत एकदाही या सिनेमाचा मॅटिनी शो रद्द करण्याची वेळ आली नव्हती. मात्र मंगळवारी डीडीएलजेचा शो दाखवण्यात आला नाही.


श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'हसीना पारकर' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या स्क्रीनिंगसाठी 'डीडीएलजे'चा खेळ रद्द करण्यात आला. 'क्वीन ऑफ मुंबई' अशी ख्याती असलेली गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे.

हसीना पारकर डोंगरीची रहिवासी असल्यामुळे त्याच्या जवळ असलेल्या मराठा मंदिर चित्रपटगृहात ट्रेलर रिलीज करण्याची सिनेमाच्या दिग्दर्शकाची इच्छा होती, असं मराठा मंदिरचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी सांगितलं.



'डीडीएलजे चित्रपटावर कोणताही अन्याय झालेला नाही. हसीना पारकरच्या निर्मात्यांनी हाऊसफुल शोसाठी लागणारी रक्कम देण्याचा प्रस्ताव मांडला. तो मी यशराज फिल्म्स (डीडीएलजेचे निर्माते) पर्यंत पोहचवला. त्यांच्या संमतीनेच हा ट्रेलर लाँच झाला' असं देसाईंनी स्पष्ट केलं.

मॅटिनी शोचं तिकीट 15 ते 20 रुपये इतकं आहे. चित्रपटगृह वीकेंडला बऱ्याच वेळा फुल होतं. सोमवारी थिएटरबाहेर बोर्ड लावून मंगळवारचा शो रद्द झाल्याची माहिती प्रेक्षकांना देण्यात आली होती. मराठा मंदिरची सुरुवात 1950 मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदाच या थिएटरमध्ये ट्रेलर लाँच होत आहे.