Film Director on OTT Actors : आजच्या तारखेला ओटीटी (OTT) माध्यम हे झपाट्याने वाढणाऱ्या मनोरंजनाच्या माध्यमांपैकी एक आहे. अनेक मोठे कलाकार त्यांच्या अभिनयासाठी हल्ली ओटीटीचं माध्यम निवडताना देखील पाहायला मिळालं आहे. त्याचप्रमाणे अनेक कलाकार ओटीटी माध्यमांवरुनच त्यांचं पदार्पण करतात. त्यामुळे प्रेक्षकांचीही बरीच पसंती हल्ली ओटीटी माध्यमांना मिळत असल्याचं चित्र आहे.
सध्या अनेक सिनेमे हे थिएटरमध्ये न जाता ओटीटीवरच प्रदर्शित होतात. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी थेट ओटीटीवरील कलाकारांना आव्हानच दिलं असल्याचं पाहायला मिळतंय.
डेविड धवन यांचं कलाकारांना आव्हान
डेविड धवन यांनी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अरबाज खान याला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी अरबाजने ओटीटी माध्यमामुळे सिनेमांचा प्रभाव थोडा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारला. यावर डेविन यांनी उत्तर देताना म्हटलं की, ओटीटीवर कुणीही करेल, पण खरी परीक्षा ही थिएटरमध्येच असते.
पुढे डेविड यांनी म्हटलं की, नाही ओटीटीमुळे सिनेमांचा प्रभाव अजिबात कमी झालेला नाही. जे कलाकार ओटीटीवर काम करतात त्यांनी थिएटरमध्ये यावं आणि स्वत:ची लायकी दाखवावी. ओटीटीवरील कलाकार हे थिएटरमधील सिनेमे करु शकणार नाही. कारण शेवटी तुमचं खरं कौतुक हे तिथेच होतं. तिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुम्हाला स्वत:हून पाहायला मिळते. तो टाळ्यांचा कडकडाट अनुभवता येतो आणि याहूनच मोठी गोष्ट कोणतीही नाही. ही प्रतिक्रिया तुम्हाला ओटीटीवर कधीच मिळणार नाही.
ओटीटीवर अनेक सिनेमे रिलीज
ओटीटीवर आतापर्यंत अनेक कलाकारांचे सिनेमे रिलीज झाले आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी ओटीटी माध्यमांवरील सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अरबाज खानचाही सिनेमा पटना शुक्ला हा ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्याचप्रमाणे नवाजउद्दीकीन सिद्धीकीपासून ते मनोज वाजपेयी यांनी देखील ओटीटीवरील अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. इतकंच नव्हे तर अनेक सिरिजमधूनही हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.