कोल्हापूर : मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान आज कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार आहे. मोतीबाग तालमीचे वस्ताद आणि ‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगुले यांनी आमीर खानला निमंत्रण दिलं होतं, ते  आमीरने स्वीकारलं आहे.


कुस्तीवर आधारीत दंगल हा त्याचा चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. त्या पार्श्वभूमीवर आमीर खान कुस्तीच्या पंढरीत येतोय. हिंदकेसरी दादू चौगुले यांच्या मोतीबाग तालमीला आमीर भेट देईल. त्यापूर्वी तो चौगुले यांच्या घरी खास कोल्हापुरी थंडाईची चवही चाखणार असल्याची माहिती मिळतेय.  दंगलमध्ये आमीर कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांची भूमिका साकारतो आहे.

आमीर खानचा दंगल हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांमुळे सिनेमाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

आमीरच्या कामाने दादू चौगुले खूपच प्रभावीत झाले आहेत. त्यामुळेच दादू चौगुले यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध मोतीबाग तालमीत येण्याची विनंती आमीरला केली.

मोतीबाग तालमीत केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातील मल्ल कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी येतात. मोतीबाग तालीम  देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमीर खाननेही या आखाड्याला भेट देण्याची विनंती दादू चौगुले यांनी केली. आमीर खानने पारंपारिक कुस्ती पाहावी, अशी त्यांची इच्छा आहे.

कोल्हापुरात अजूनही मातीतील कुस्ती खेळली जाते. मातीत दूध, तूप, हळद मिसळून ही माती रोगप्रतिकारक बनवली जाते. या मातीत कुस्ती होते, हे आमीर पाहणार आहे.

संबंधित बातमी
वस्तादांचं निमंत्रण, आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार!