मुंबई : दंगल, सिक्रेट सुपरस्टार यासारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिमने आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगितलं. आपण डिप्रेशनमध्ये असल्याचा स्वीकार अखेर चार वर्षांनंतर केल्याचं झायरा सांगते. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून झायराने ही गोष्ट सांगितली आहे.


काय आहे झायराची पोस्ट?

एका मोठ्या काळापासून मला अँक्झायटी आणि डिप्रेशनने ग्रासले आहे. आता जवळपास चार वर्ष झाली असून ही गोष्ट मान्य करायला मी कचरत होते.. घाबरत होते. याचं एक कारण म्हणजे डिप्रेशन या शब्दाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन. त्याहून महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन येण्यासाठी तू फारच लहान आहेस, किंवा ही तात्पुरती अवस्था असल्याचं मला सांगितलं जायचं.

ही तात्पुरती अवस्था असू शकली असती, पण या अवस्थेनेच मला नकोशा परिस्थितीत आणून सोडलं आहे. दिवसाला अँटिडिप्रेशनच्या पाच गोळ्या, अँक्झायटी अटॅक्स, रात्री-अपरात्री हॉस्पिटलच्या फेऱ्या, रितेपणा, अस्वस्थता, हूरहूर, हॅल्युसिनेशन्स, सूज, अतिझोप किंवा आठवडाभर डोळ्याला डोळा न लागणं, खूप खाणं किंवा भूक उडणं, थकवा, अंगदुखी, स्वतःचा तिटकारा येणं, नर्व्हस ब्रेकडाऊन, आत्महत्येचे विचार... हे सगळं त्या अवस्थेचा भाग होते.

माझ्यासोबत काहीतरी ठीक नाही, हे मला समजत होतं. हे डिप्रेशन आहे, असंही कधी वाटायचं. वयाच्या बाराव्या वर्षी मला पहिला पॅनिक अटॅक आला होता. चौदाव्या वर्षी दुसरा.. त्यानंतर तर ते मोजणंच बंद केलं. किती औषधं घेतली, याची मोजदादच नाही. कितीवेळा 'तू डिप्रेशनसाठी खूपच लहान आहेस' हे सांगितलं गेलं, याची गणती नाही. डिप्रेशन असं काही नसतंच, असंही मला सांगितलं गेलं.

जगभरात 350 मिलियन व्यक्तींना ज्याने ग्रासलं आहे, ते डिप्रेशन मलाही आल्याचं मान्य करायला मी तयारच नव्हते. ही भावना नाही, हा आजार आहे. मला डिप्रेशनचं निदान होऊन साडेचार वर्ष लोटली. अखेर मी माझं हे रुप स्वीकारायला तयार झाले.

आता मला सगळ्यापासून ब्रेक हवा आहे. माझं काम, सोशल लाईफ, शाळा आणि विशेष म्हणजे सोशल मिडीया. मला आशा आहे की येत्या रमझानच्या पवित्र महिन्यात सकारात्मक बदल घडेल. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या भावनिक चढउतारांमध्ये माझी साथ देणाऱ्या सर्वांना मिठी. इतका संयम ठेवल्याबद्दल माझ्या कुटुंबीयांचे विशेष आभार.

झायराच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

झायराने दंगल, सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये आमिर खानसोबत काम केलं आहे. झायराला दंगलमधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही आपल्याला डिप्रेशन आल्याचं सांगितलं होतं. आता 17 वर्षांच्या झायरानेही हे मान्य केलं आहे. झायरा लवकर यातून बरी होईल, याच सदिच्छा.