मुंबई : 'रुस्तम' चित्रपटात वापरलेल्या नौदलाच्या गणवेशाचा लिलाव केल्याप्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी, अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. 'सशस्त्र दल अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी' 11 संरक्षण अधिकारी आणि आठ इतर व्यक्तींनी ही नोटीस पाठवली आहे.


लिलाव केलेला पोशाख 'ओरिजिनल नेव्हल युनिफॉर्म' असल्याचं सांगत अक्षय कुमारने अवमान केल्याचा दावा केला जात आहे.
11 संरक्षण अधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली असून इतर आठ जणांमध्ये नौदल अधिकाऱ्याची पत्नी आणि सात निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

'सशस्त्र दलाच्या गणवेशासारखा असलेला हा पोशाख राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका आहे. गणवेशावर असलेली चिन्हं आणि बॅज निस्सीम सेवेचं द्योतक आहेत. त्यामुळे राष्ट्रविरोधी घटक त्याचा दुरुपयोग करु शकतात.' असं नोटिशीत म्हटलं आहे.

वर्दीचा लिलाव करण्यात काहीच गैर नाही : अक्षय कुमार

या नोटिशीची एक प्रत लिलाव करणारी संस्था 'सॉल्ट स्काऊट' आणि संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे. गणवेशाचा लिलाव रोखण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

नौदलाच्या युनिफॉर्मबाबत अनादर दाखवत सशस्त्र दल अधिकारी, निवृत्त अधिकारी, आजी-माजी अधिकाऱ्यांच्या विधवा, त्यांचे कुटुंबीय यांच्या भावना दुखावल्याचा दावा नोटीशीत करण्यात आला आहे.

नौदल अधिकारी के. एम. नानावटी यांच्या आयुष्यावर आधारित 'रुस्तम' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. नानावटींनी पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर त्यांच्यावर चाललेल्या खटल्याची कहाणी सिनेमात दाखवली होती.

अक्षयकुमारने 26 एप्रिल रोजी या गणवेशाचा लिलाव सुरु केला. प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या एका एनजीओला ही रक्कम देण्यात येणार आहे. 26 मे रोजी संपणाऱ्या या लिलावाची बोली सध्या 2 लाख 35 हजारांवर पोहचली आहे.