Dada Saheb Phalke Award: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरला आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख या आशा यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीला पाठवत होत्या. त्यावेळी दिग्दर्शक बिमल रॉय यांनी एका समारंभात आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय दहा वर्ष होते. आशा यांचे नृत्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना 1957 मध्ये रिलीज झालेल्या मां या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर बाप बेटी या चित्रपटात देखील आशा पारेख यांनी काम केलं. राजेश खन्ना, मनोज कुमार , सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केली आहे. 95 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
हिट चित्रपटांमध्ये केलं काम
जब प्यार किसी से होता है (1961), तीसरी मंझिल आणि दो बदन (1966), कटी पतंग (1970), कारवां (1971), आणि मैं तुलसी तेरे आंगन की (1978) या हिट चित्रपटांमध्ये आशा यांनी काम केलं आहे. अभिनय सोडल्यानंतर, आशा यांनी ज्योती या गुजराती मालिकेचे दिग्दर्शन केले.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो . 2019 मध्ये रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्यात आला. ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :