Dada Kondke : लोकप्रिय विनोदी अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. येत्या 8 ऑगस्टला त्यांची 91 वी जयंती आहे. आपल्या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या विनोदी संवादांनी प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. दादा कोंडके अभिनेते असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शकही होते.


दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके असं आहे. अभिनयासह त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती सिनेमांची निर्मितीदेखील केली आहे. 'विच्छा माझी पुरी करा' या लगनाट्याच्या माध्यमातून दादा कोंडके लोकप्रिय झाले. 'तांबडी माती' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. 


लालबागमध्ये जन्मलेल्या दादा कोंडके यांचे वडील गिरिनी कामगार होते. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाल्याने त्यांचे नाव 'कृष्णा' असे ठेवण्यात आले. लहानपणापासूनच ते प्रचंड खोडकर होते. पुढे त्यांनी 'अपना बाजार'मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबत त्यांची ओळख जाली. आणि वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांचं हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. पुढे भालजी पेंढारकरांनी त्यांना 'तांबडी माती' या सिनेमासाठी विचारणा केली. 


दादा कोंडकेंचा सिनेप्रवास...


'तांबडी माती' या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या दादा कोंडके यांनी 'सोंगाड्या', 'आंधळा मारतो डोळा', 'पांडू हवालदार', 'राम राम गंगाराम', 'बोल लावीन तिथे गुदगुल्या' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं. पुढे कामाक्षी प्रॉडक्शन नावाची निर्मिती संस्था त्यांनी सुरू केली. या संस्थेअंतर्गत त्यांनी एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, पळवा पळवी अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली. त्यांच्या सर्वच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. 


दादा कोंडके यांचा 'सोंगाड्या' हा सिनेमा काही कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावेळी हा सिनेमा रिलीज व्हावा यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांना मदत केली. दादा कोंडके हे मराठी माणूस असल्यामुळेच बाळासाहेब त्यांच्या मदतीला धावून आले. मराठी मनोरंजनसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात दादा कोंडके यांचा मोलाचा वाटा आहे.


महाराष्ट्राचा सुपरस्टार, हरहुन्नरी कलावंत आणि अतीशय विनोदी अभिनेते अशी दादा कोंडके यांची ओळख आहे. कृष्णा खंडेराव कोंडके असं दादा कोंडके यांचं संपूर्ण नाव आहे. त्यांचे ओळीने नऊ सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले आहेत. उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. 


संबंधित बातम्या


Dada Kondke Birth Anniversary : 'दादांची दादागिरी'; दादा कोंडकेंच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना गोल्डन ज्युबिली सिनेमे पुन्हा पाहायला मिळणार