मुंबई : 70च्या दशकात जेव्हा चित्रपटसृष्टीवर हिंदी सिनेमांचा पगडा होता, तेव्हा नायगावच्या एका सोंगाड्याने आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्राचा प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे खेचला. या अवलियानं सेन्सॉर बोर्डाला झुगारत द्व्यर्थी सिनेमांना चित्रपटात अर्थ मिळवून दिला. इतकंच नाही तर सलग 9 चित्रपट सिल्व्हर ज्युबली करुन दाखवत टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलं.
हाफ पँट, त्यात लोंबकळणारी नाडी, ढगळं शर्ट, घसा खाकरल्यासारखा आवाज, बावळट चेहरा अशा गबाळ्या व्यक्तिमत्त्वाच्या नायकावर एखादी नटी भाळते हीच मोठी आश्चर्याची गोष्ट होती. पण ती नटी भाळते, अहो नटीच काय प्रेक्षकही भाळतो आणि सिनेमा हिट होतो. केवळ हिटच नाही तर त्याची सिल्व्हर ज्युबली होते आणि गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होते. फॅन्टसी वाटणारी ही गोष्ट खरी करुन दाखवली ती दादा कोंडके या अवलियाने
70-80 दशकात जेव्हा हिंदी सिनेमात देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर या हॅण्डसम हंकचा दबदबा होता, तेव्हा या सोंगाड्याने आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्रातली चित्रपटगृह दणाणून सोडली आणि मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला नवी उभारी मिळाली.
दादांचं सेन्सॉर बोर्डाशी तर सात जन्माचं वैरच जणू. दादांचे चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डाची कात्री हे जणू त्याकाळचं ठरलेलं समीकरण. पण दादांच्या युक्तीवादापुढे सेन्सॉर बोर्डाची कात्री कायमच बोथट व्हायची
"त्यावेळी दादा गाणी लिहायचे, त्यात चावट शब्द असायचे. त्या शब्दांना आक्षेप येणार हे माहित असायचं. त्यामुळे त्याचा प्रत्येक शब्द दादांनी तयार करुन ठेवलेला असायचा. ते शक्यतो भांडायचे, आम्हाला सेन्सॉरशी भांडल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं," असं दादांचे सहाय्यक दिग्दर्शक बाळ मोहिते सांगतात.
ऑगस्ट 1932 ला गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर दादांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचही नाव कृष्णा ठेवण्यात आलं. पण पुढे त्यांच्या खोडकर आणि खट्याळ स्वभावामुळे ते सगळ्यांचेच ‘दादा’ बनले.
नायगावच्या कामगार चाळीत जन्माला आलेल्या दादांना शाळेत असताना कविता करण्याचा छंद होता. तसंच लोकनाट्यातही त्यांना विशेष रस होता.
लोकनाट्याच्या निमित्तानं दादांनी राज्यभर दौरे केले. या दौऱ्यांतून त्यांना प्रेक्षकांची अभिरुची लक्षात आली. याच दरम्यान दादांची ज्येष्ठ नाटककार वसंत सबनीसांची भेट झाली. वसंत सबनीसांच्या 'छपरी पलंगाचा वग' यावर लोकनाटय करायचं दादांनी ठरवलं. त्यानंतर काळाची बदलती पावलं ओळखून, त्याला आधुनिक रंग देऊन 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य प्रेक्षकांपुढे सादर केलं. दादांच्या हजरजबाबी, तल्लख आणि धारदार शब्दांनी तसंच दमदार अभिनयाने या नाटकाला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. इतकंच नाही तर तमाशा कलेला नवजीवन प्राप्त झालं.
'विच्छा...'चे 1500 हून अधिक प्रयोग झाले. 'विच्छा...'ने दादांना पैसा, नाव, इज्जत सगळं काही दिलं. 31 मार्च1975 ला हैदराबादला 'विच्छा...'चा शेवटचा प्रयोग झाला. पण त्यानंतर दादांनी कधीच लोकनाट्य केलं नाही.
लोकनाट्यातला हा शेवट असला तरी चित्रपटसृष्टीत ही दादांची सुरुवात होती. 1969 मध्ये दादांची प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकरांसोबत ओळख झाली. 'तांबडी माती' या सिनेमासाठी भालजी पेंढारकरांनी दादा कोंडकेंची निवड केली आणि कोल्हापुरात या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं. मात्र चित्रपट सपशेल अपयशी ठरला.
पण अपयशाने खचून न जाता दादांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि 'सोंगाड्या' या सुपरहिट सिनेमाची निर्मिती केली. 1971 मध्ये आलेल्या 'सोंगाड्या'ने दादांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
"सोंगाड्या प्रदर्शित व्हायचा होता त्यावेळी दादांनी कोहिनूर थिएटर, जिथे सध्या नक्षत्र मॉल आहे दोन आठवड्यांसाठी घेतलं होतं. त्यानंतर तिथे देव आनंदचा तेरे मेरे सपने लागणार होता. सोंगाड्या सुपरहिट होता. पण अॅग्रीमेंटनुसार चित्रपट उतरवा लागेल, असं थिएटर मालकांनी सांगितलं. चित्रपट चालतोय म्हटल्यावर तो उतरवणं दादांना योग्य वाटलं नाही. त्यावेळी दादा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेबांनी मध्यस्थी केली. चित्रपट उतरवण्यास मनाई केली. तिथे हा चित्रपट खूप चालला. सोंगाड्याला खूप यश मिळालं," असा अनुभव 'एकटा जीव'च्या लेखिका अनिता पाध्ये यांनी सांगितला.
यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची घट्ट मैत्री झाली ती कायमचीच.
दादांची पहिलीच निर्मिती असलेला 'सोंगाड्या' सुपरडुपर हिट झाला. 5 आठवडे पुण्यात आणि 37 आठवडे मुंबईत चालणाऱ्या या सिनेमाला न भूतो न भविष्यती यश मिळालं. दादांनीही त्यावेळी कदाचित कल्पनाही केली नसावी पण या सिनेमाची सिल्व्हर ज्युबली दणक्यात साजरी झाली. 'सोंगड्या'चा यशानंतर दादांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
'सोंगाड्या'च्या यशानंतर दादांनी धनगरांवर चित्रपट बनवण्याचं ठरवलं आणि 'एकटा जीव सदाशिव'चा जन्म झाला. याही चित्रपटाला तुफान यश मिळालं. पण दुर्दैवाने याच चित्रपटाच्या वेळी वसंत सबनीस आणि दादा कोंडके यांच्यातले संबंध गैरसमजामुळे दुरावले गेले, ते कायमचेच.
दादांचा सलग दुसरा चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्यांची जबाबदारी आणखीच वाढत गेली. 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाल्यानंतर सात-आठ महिन्यातच त्यांनी नवा चित्रपट काढण्याचं ठरवलं. 'एकटा जीव सदाशिव'ने दादांना यश तर दिलं पण त्यांची जुनी माणसं मात्र दुरावली गेली.
त्यामुळे आता 'आंधळा मारतोय डोळा' या सिनेमाची जबाबदारी नवख्यांच्या खांद्यावर होती. या सिनेमात दादांनी डबल रोल केला. त्यातला एक म्हणजे नेहमीचाच दादा कोंडके आणि दुसरा म्हणजे कृष्णकुमार. पण सुटाबुटातल्या कृष्णाकुमारची भूमिका साकारणाऱ्या दादांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. तेव्हापासून दादांनी आयुष्यात कधीही डबलरोल न करण्याचं ठरवलं. पण अख्खी टीम नवखी असूनही 'आंधळा मारतो डोळा' जबरदस्त हिट झाला आणि या सिनेमाची सिल्व्हर ज्युबली झाली. ही किमया केवळ दादाच करु शकत होते
'आंधळा मारतोय डोळा' भरघोस यशानंतर दादांनी चौथा सिनेमा काढला तो 'पांडू हवालदार'. या चित्रपटाच्या निमित्ताने उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. लागोपाठ चौथा सिनेमा हिट झाल्यामुळे दादांचा एक यशस्वी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून सर्वत्र उदोउदो होत होता.
त्यानंतर आलेल्या 'तुमचं आमचं जमलं', 'राम राम गंगाराम', 'बोटं लावीन तिथे गुदगुल्या', 'ह्योच नवरा पाहिजे', 'आली अंगावर', 'मुका घ्या मुका', 'पळवा पळवी', 'येऊ का घरात' आणि 'सासरचं धोतर', 'गनिमी कावा' याही सिनेमांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
दादांना कोणती गोष्ट कधी कुठे कशी सुचेल याचा काही नेम नाही. आता 'ढगाला लागली कळं' या गाण्याचंच घ्या ना. सुपरडुपर हिट गाणं माहित नसलेला शोधूनही सापडणार नाही आणि दादांना हे गाणं सुचलं ते चक्क शिकारी करताना. त्याचं झालं असं...
दादा एकदा शिकारीला गेले असताना, अचानक वळवाचा पाऊस पडायाला लागला. दादा एका झाडाखाली उभे राहिले. तेव्हा पाऊस थांबल्यावर झाडातून गळणारं पाणी पाहून दादांना वर 'ढगाला लागली कळं' सुपहिट गाणं सुचलं. या गाण्याचे बरेचसे मुखडे दादांनी शिकारीच्या दरम्यानच लिहिले.
दादांच्या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे त्यांच्या चित्रपटांची नावं. त्यामुळे इथे दादांनी नव्या सिनेमाची घोषणा केली की तिथे सेन्सॉर बोर्डाला धडकी भरायची.
'अंधेरी रात में दिया तेरे हाथ' में हा चित्रपटही सुरुवातीलाच नावावरुन सेन्सॉरच्या कात्रीत अडकला. सेन्सॉरने 'दिया' या शब्दावर आक्षेप घेतला. पण दादांनी सेन्सॉरला नेहमीप्रमाणे आपल्या बिनतोड व्यक्तिवादाने हे नावंही पटवून दिलं. यावेळी सुद्धा सेन्सॉरची कात्री बोथट पडली आणि चित्रपट चांगलाच गाजला.
मराठीसोबतच दादांनी हिंदीतही आपला ठसा उमवटवला. तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, खोल दे मेरी जुबान, आगे की सोच या त्यांच्या हिंदी सिनेमांचीही बरीच चर्चा झाली.
'एकटा जीव सदाशिव' या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूर यांनी आपल्या मुलाला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असं म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूर यांना सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती.
सुपरस्टार असूनही दादांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे दिग्दर्शक, लेखक, सहकलाकारांसोबत त्यांचं उत्तम ट्युनिंग जुळायचं.
सुपस्टार असूनही दादा त्यांचं खासगी आयुष्य अंत्यत साधेपणाने जगले. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची तर त्यांना भारी हौस. शिकारीचीही त्यांना खूप आवड होती.
प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या, खळखळून हसवाणाऱ्या दादांची कौटुंबिक सुखाची विच्छा मात्र कधीच पुरी झाली नाही. त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिलं.
दिग्दर्शक भालजी पेंढारकरांनी दादांना कायमच आपला मुलगा मानलं. 'तांबडी माती'नंतर दादांच्या प्रत्येक सिनेमाच्या शूटिंगला भालजींची आवर्जून हजेरी असायची. इतकंच नाही तर दादांच्या कपड्यांची स्टाईलसुद्धा भालजी पेंढारकराकडून प्रेरित झालेली आहे.
अखेर 14 मार्च 1998 रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास दादरमधील रमा निवास या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने या 'सोंगाड्या'ने नकोशी एक्झिट घेतली आणि हा हास्ययात्री अंतिम प्रवासाला कायमचा निघून गेला.
लाखो करोडों चाहत्यांच्या गर्दीत हा सोंगाड्या कायमच एकटा राहिला.
लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात दादा म्हणतात, माझं दु:खं एकटेपण मी सहसा मी कुणाला जाणवू देत नाही त्यामुळे मी एकटा मजेत जगतो, अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत, अशी मी स्वत:चीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश ,काहीही दिलं नाही तरी चालेल पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे.
सिनेसृष्टीतल्या या दादा माणसाला एबीपी माझाचा सलाम
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
दादा कोंडके जयंती विशेष : बोटं लावीन तिथे गुदगुल्या करणारा अभिनेता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2017 01:35 PM (IST)
प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या, खळखळून हसवाणाऱ्या दादांची कौटुंबिक सुखाची विच्छा मात्र कधीच पुरी झाली नाही. त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -