Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. चंद्रकांत कणसे (Chandrakant Kanse) दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या सिनेमाने सिनेमागृहात यशाचा झेंडा रोवला आहे. तीन दिवसांत या सिनेमाने दोन कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'दगडी चाळ' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर प्रेक्षक 'दगडी चाळ 2'ची आतुरतेने वाट पाहत होते. तब्बल सात वर्ष प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असून आता सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात झुंबड उडवली आहे. प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या किंवा टाळ्यांचा कडकडाट करत प्रेक्षक सिनेमाला तुफान प्रतिसाद देत आहेत.
'दगडी चाळ 2'ची कमाई घ्या जाणून...
'दगडी चाळ 2'हा सिनेमा 350 हून अधिक स्क्रीन वर दाखवला जात आहे. दहीहंडीच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून अवघ्या तीन दिवसात 2,05,34,814 चा गल्ला सिनेमाने जमवला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 51,82,745 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 70,48,372 आणि तिसऱ्या दिवशी चक्क 83,03,697 चा गल्ला जमवलेला आहे.
'शंभो' म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त 'दगडीचाळ 2' चा डंका वाजताना दिसत आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते.
निर्मात्या संगीता अहिर म्हणतात," प्रेक्षक आणि समिक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. दगडीचाळ प्रमाणेच 'दगडी चाळ 2' ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कष्टाचं चीज झाल्याचं वाटत आहे. इतक्या कमी वेळात मिळालेल्या उत्तुंग यशानंतर मी निःशब्द झाले आहे. सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम करीत राहाल अशी आशा आहे ."
संबंधित बातम्या