मुंबई : अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील कोणे एके काळची प्रचंड हिट जोडी. तब्बल 17 वर्षांनी अनिल-माधुरीची केमिस्ट्री आपल्याला 'टोटल धमाल' सिनेमात पाहायला मिळणार आहे. अजय देवगन, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, महेश मांजरेकर, जॉनी लिव्हर अशी कलाकारांची फौज या सिनेमात झळकणार आहे. मात्र या सिनेमात 'क्रिस्टल'ही तुमची टोटल धमाल करायला येत आहे.


क्रिस्टल कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? क्रिस्टल द मंकी… खट्याळ, खोडकर आणि तेवढीच गोड... तब्बल 30 हॉलिवूडपटांमध्ये क्रिस्टलने काम केलं आहे. 'जॉर्ज ऑफ द जंगल' हा तिचा पहिला सिनेमा. क्रिस्टल पाहाता पाहाता सुपरहिट झाली. 'नाईट अॅट द म्युझियम' हा सिनेमा तर क्रिस्टलने अक्षरश: खाऊन टाकला.

दिग्दर्शकाला हवा तसा शॉट अगदी कसलीच कटकट न करता देण्यात क्रिस्टल चांगलीच माहीर आहे. याचं श्रेय अर्थातच तिचा ट्रेनर टॉम गुंडरसनला जातं. क्रिस्टलच्या पहिल्या वाढदिवशी टॉम गुंडरसन तिला घरी घेऊन आला आणि तिथून तिचं ट्रेनिंग सुरु झालं. कॅमेऱ्यासमोर ज्या-ज्या करामती कराव्या लागतात त्या सगळ्याचं प्रशिक्षण क्रिस्टलला टॉमने दिलं आहे. अगदी रेड कॉरपेटवर चालण्यापासून ते फोटोग्राफर्सना पोज देण्यापर्यंत.

क्रिस्टलच्या नावावर जवळपास तीस हॉलिवूडपट आहेत. आता हीच क्रिस्टल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'टोटल धमाल' सिनेमातला क्रिस्टलची अनोखी अदा कशी धमाल आणते, हेच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे