Cruise Drugs Case: क्रूज ड्रग्स प्रकरणी चित्रपट अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली आहे. यावेळी तिचे वडील अभिनेता चंकी पांडेही तिच्यासोबत होते. एनसीबीने अनन्या पांडेची चौकशी करण्यासाठी प्रश्नांची यादी तयार केली आहे. एनसीबी विशेषत: व्हॉट्सअॅप चॅट संदर्भात अनन्याला प्रश्न विचारतील. आज एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आणि तिला चौकशीसाठी समन्स बजावले होते.


अनन्या पांडेच्या घरावर छापा
एनसीबीच्या टीमने गुरुवारी मुंबईतील अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. या दरम्यान, एजन्सीने अनन्याच्या घरातून फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. एनसीबीने या वस्तू त्यांच्यासोबत घेतल्या आहेत. आता ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची टीम अनन्याची चौकशी करेल.


अनन्या पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. एनसीबी गुरुवारी शाहरुख खानचे घर 'मन्नत'वर पोहचली. क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये आहे.


'मन्नत'वर छापा नाही, NCB चं स्पष्टीकरण


मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी  शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं. 


शाहरुख मुलगा आर्यनला भेटला
गुरुवारी सकाळी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला भेटण्यासाठी आला. तो तेथे सुमारे 15 मिनिटे थांबला. आर्यनच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटायला आला होता.


यापूर्वी बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खान आणि इतर 8 जणांना 3 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. क्रूझ जहाजावर एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.