'ढिशूम'मधील गाण्यामुळे जॅकलिन फर्नांडिसवर फौजदारी खटला
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2016 06:59 AM (IST)
मुंबई : श्रीलंकन ब्यूटी अशी ओळख असलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत येण्याची शक्यता आहे. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी जॅकलिनसह 'ढिशूम' चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक रोहित धवन यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. ढिशूम चित्रपटातील एका गाण्यात जॅकलिनने किरपाण घेऊन डान्स केला आहे. शीख समुदायात किरपाणला धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे रविंद्र सिंग बस्सी यांनी तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. 15 जून रोजी दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना लेखी तक्रार देऊन वादग्रस्त गाणं हटवण्याची मागणी केली होती. किरपाणसारख्या धार्मिक वस्तूचा अनादर केल्याची तक्रार समुदायातर्फे करण्यात आली होती. दरम्यान, 1 जुलै रोजी कोर्टात यावर पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी साक्षीदार हजर करण्याच्या सूचना तक्रारदार आणि वकिलांना देण्यात आल्या आहेत.