मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं जुनं आहे. विराट-अनुष्का यांच्या लग्नामुळे हे नातं दृढ झालं. त्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची भीती चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
खरंतर हार्दिक किंवा एली, या दोघांपैकी कोणीही आपलं अफेअर असल्याचं खुल्लमखुल्ला सांगितलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आपल्या ब्रेकअपबद्दल ते उघडपणे बोलणार नाहीत. मात्र 'मुंबई मिरर'च्या रिपोर्टनुसार सध्या दोघंही एकत्र नाहीत.
विशेष म्हणजे एका नवोदित अभिनेत्रीमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावली होती, तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं डेटिंग?
हार्दिक पांड्या जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना एलीसुद्धा दक्षिण आफ्रिकेला फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
शिखर धवनची पत्नी आयेशाने त्यांची मुलगी रियाच्या 13 व्या वाढदिवसाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये दौऱ्यावर असलेल्या क्रिकेटपटूंच्या बेटर हाफ (वॅग्स- वाईफ अँड गर्लफ्रेण्ड्स) दिसत होत्या. रोहितची पत्नी रितीका, भुवीची पत्नी नुपूर, अश्विनची पत्नी प्रिती, उमेशची पत्नी तान्या, राहाणेची पत्नी राधिका यांच्यासोबत एलीसुद्धा फोटोत दिसली होती.
अॅड शूट असो किंवा मॅचसाठी चिअर करणं, एली आणि हार्दिक जागोजागी एकत्र दिसत होते. इतकंच काय, नुकत्याच झालेल्या आयपीएलमधील चेन्नईविरुद्धच्या सामन्यात एली हार्दिकच्या मुंबई इंडियन्स संघासाठी चिअर करायलाही गेली होती. मात्र त्यानंतरच माशी शिंकल्याचं दिसत आहे.
एली अवराम बिग बॉसच्या एका पर्वात झळकली होती. त्याशिवाय तिने मिकी व्हायरस, किस किसको प्यार करु, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.