छत्तीसगड : 'छोटे सरकार' चित्रपटातील गाण्यावरुन अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 'एक चुम्मा तू मुझको उधार दे दे' या गाण्यातील शब्द आणि अश्लील नृत्याप्रकरणी गोविंदा, शिल्पासह सात जणांना फरार घोषित करण्यात आलं आहे.
गोविंदा, शिल्पा शेट्टी, निर्माता-दिग्दर्शक विमल कुमार, गायक उदित नारायण, गायिका अल्का याज्ञिक, संगीतकार अन्नू मलिक आणि राणी मलिक अशा सात जणांना झारखंडच्या सीजेएम पाकुडमधल्या न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊनही सातही जण उपस्थित राहिले नव्हते.
20 जुलै रोजी न्यायालायने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मात्र 18 नोव्हेंबरलाही कोणताही आरोपी कोर्टात हजर झालेला नाही. "एक चुम्मा तु मुझको उधार देई दे" या गाण्यात बिहारचा अवमान केल्याचा आणि अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
1996 मध्ये हिट ठरलेल्या या गाण्यामुळे वीस वर्षांनी सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. रांची हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका 18 ऑक्टोबर 2001 रोजी फेटाळून लावण्यात आली होती. कनिष्ठ कोर्टात यावरील सुनावणी पार पडेल, असं हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना बजावलं होतं.