नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या अभिनयाबरोबरच मोदी सरकारवरील टीकेमुळे सातत्याने चर्चेत असते. तिने आतापर्यंत केंद्र सरकारविरोधातील अनेक आंदोलनात भाग घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर ट्रोल होऊनही, जीवे मारण्याच्या धमक्या येऊनही तिने अनेकवेळा आपलं मत खुलेपणाने मांडलं आहे. आताही तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पंतप्रधानांचा एक फोटो शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे. त्या फोटोखाली लिहिले आहे की, "मंदिर त्याच ठिकाणी निर्माण होत आहे, पण हॉस्पिटलमध्ये बेड मागून लज्जीत करू नका, धन्यवाद."
देशात कोरोनाची रुग्णसंख्या रोज विक्रमी आकडेवारी गाठत असताना देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. देशातील अनेक भागात हॉस्पिटलमध्ये बेड्स नाहीत, तसेच ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. आता याच मुद्द्यावरून अभिनेत्री स्वरा भास्करने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री देशवासियांना संबोधित केलं. देशात अनेक राज्यांनी निर्बंध कडक केले आहे, तर काही राज्यांनी वीकेंड लॉकडाऊन लागू केलं आहे. देशातील विविध राज्यांच्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. कोरोना संकटात नागरिकांचे जीव वाचले पाहिजेत. मात्र देशाचं अर्थचक्रही सुरु राहिलं पाहिजे. त्यामुळे 'दवाई भी कडाई भी' याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. तरुणांना या संकटाना पुढे येऊन मदत केली पाहिजे."
देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असून मंगळवारी एकाच दिवसात 2.59 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 1761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर उपाययोजना म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यु, विकेण्ड लॉकडाऊन अशा अनेक पर्यायांचा वापर सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Remdesivir | केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेमडेसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला
- माध्यम स्वातंत्र्याबद्दल भारताची स्थिती 'वाईट'; World Press Freedom Index च्या अहवालात मोदी सरकारवर ताशेरे
- Tata Steel | सेवेत तत्पर! टाटा स्टीलकडून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर दिवशी 300 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा