मुंबई : आपला आवडता कलाकार आपल्यासमोर आला तर आपण काय करतो? सर्वसाधारणपणे आपण किंचाळतो. त्या कलाकारासोबत शेकहॅड करतो. सेल्फी काढतो.  अगदी गहिवरून आल्यासारखं होत आता नक्की बोलावं काय तेच आपल्याला कळत नाही. या सर्वसाधारण बाबी आहेत. पण इकडे जरा बाब उलटी झाली आहे. म्हणजे, पुण्यात एक भलतीच घटना घडली.  एका मॉलमध्ये एका सिनेमाचं प्रमोशन सुरू होतं. या सिनेमाचं नाव आहे फाईट.




तिथल्या पॅसिफिक मॉलमध्ये प्रमोशन सुरू असताना एक तरूणी अचनाक थेट मंचावर आली. काही कळण्याच्या आतच तिने फाईट चित्रपटाचा नायक असलेल्या जीतला मिठी मारली आणि सर्वांसमक्ष प्रेमाने चुंबनही घेतलं. यातील पुढची पायरी अशी की ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत त्या मॉलमध्ये आली होती.

हा प्रकार घडल्यानंतर तो प्रियकरही तिच्या मागोमाग मंचावर आला आणि तिला त्याने खाली घेतलं. सोबत जाबही विचारला. त्या दोघांमध्ये वाद झाला. आणि काही कळायच्या आत, तिने आपल्या प्रियकराच्या कानफटात मारली. त्यानंतर रागाने ते तिथून निघून गेले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम स्टेजवर उपस्थित होती.

फ्युचर एक्स प्रॉडक्शनने "फाईट" चित्रपटाची निर्मिती केली असून जिमी मोरे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'फाईट' या चित्रपटात जीत, सायली जोशी यांच्यासह माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू असून पिळदार शरीरयष्टी असलेला जीत चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही. पण याच महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.