मुंबई : ‘दंगल’ पाकिस्तानात रिलीज करताना सिनेमातून भारताचा तिरंगा काढू नये, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या अभिनेता आमीर खानचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेनेही आमीर खानचं अभिनंदन करण्यात आलं.


‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानमध्ये रिलीज करताना भारताचा झेंडा काढा, तेव्हाच रिलीज करु, असा वाद निर्माण झाला होता. मात्र, अभिनेता आमीर खान यांनी ठाम भूमिका मांडत, याला विरोध केला. सिनेमातून तिरंगा न काढण्याची भूमिका आमीरने लावून धरली. आमीरच्या भूमिकेची देशातील सर्वच स्तरातून स्तुती होत आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमीर खानच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमीर खानचं अभिनंदन केलं आणि ‘दंगल’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.

भारतात गेल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेला आमीर खानचा ‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानात आता रिलीज होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. कारण पाकिस्तानमध्ये रिलीज करण्याआधी पाकच्या सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील दोन सीन कापण्यास सांगितले होते. मात्र, भारतीय तिरंगा आणि राष्ट्रगीताशी संबंधित हे दोन सीन होते. मात्र, आमीर खानने ठोस भूमिका घेत, दोन्ही सीन कापण्यास विरोध केला.