मुंबई: बॉलिवूडचा बुजुर्ग अभिनेता जितेंद्र उर्फ रवी कपूर यांनी आज वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. 7 एप्रिल, 1942 ला जन्मलेल्या जितेंद्र यांचं सुरुवातीचं वास्तव्य गिरगावातील रामचंद्र बिल्डिंगमध्ये (आताचं श्याम सदन)मध्ये होतं.
जितेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेऊन स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. अमिताभ, राजेश खन्ना यांनी बॉलिवूडचा पडदा व्यापून टाकलेला असतानाच जितेंद्र यांनी स्वत:ची अभिनय तसंच नृत्याची खास स्टाईल निर्माण करत सुपरहिट चित्रपट दिले.
जितेंद्र आज जरी गिरगावात राहात नसले तरीही त्यांनी गिरगावशी असलेलं नातं आजही टिकवून ठेवलंय. ते ज्या इमारतीत म्हणजे श्याम सदनमध्ये वास्तव्याला होते, तिथे आजही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आवर्जून भेट देतात. मनोभावे आरती करतात, आपल्या मित्रांच्या भेटीगाठी घेतात, त्यांच्याशी आपुलकीने गप्पा करतात त्याही मराठीतून.
गेल्या वर्षी म्हणजे 2016 च्या श्रीगणेशोत्सवात श्याम सदन श्रीगणेशोत्सव मंडळाकडून त्यांचा खास गौरव करण्यात आला. राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार आणि वयाच्या पंच्याहात्तरीनिमित्त त्यांचा खास सन्मान करण्यात आला, तोही बाबली राव आणि माधव गोगटे या त्यांच्या जिवलग मित्रांच्या हस्ते.
यावेळी जितेंद्र यांना जे मानपत्र देण्यात आलं, त्यात त्यांच्या चित्रपटांची नावं गुंफण्यात आली होती. वयाच्या पंच्याहात्तरीतही हँडसम आणि फिट असणाऱ्या जितेंद्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....आणि दीर्घायुरारोग्य लाभावं हीच सदिच्छा....