Ashok Mulye Majha Puraskar : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (Ashok Mulye) यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार सोहळा' नुकताच दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये संपन्न झाला. ख्यातनाम अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
माझा पुरस्कार सोहळ्यात 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रसाद ओक, 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर, 'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनाही सन्मानित करण्यात आलं. याशिवाय 'मी, स्वरा आणि ते दोघे' या नाटकासाठी सुयश टिळक, लेखक आदित्य मोडक, दिग्दर्शक नितीश पाटणकर यांचाही 'माझा पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.
निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी तसंच सुकन्या मोने, प्रतीक्षा लोणकर, मुक्ता बर्वे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात 'गाणी फक्त लताची' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अजय मदन यांनी संगीत संयोजन केलं होतं.
'माझा पुरस्कार' खास
'माझा पुरस्कार' हा अशोक मुळ्ये देतात त्यामुळे त्यांचा आहे. तसेच हा पुरस्कार ज्या कलावतांना मिळतो तेही 'माझा पुरस्कार' मिळाल्याचे सांगतात. प्रेक्षकदेखील 'माझा पुरस्कार' पाहिल्याचे सांगतात. त्यामुळे 'माझा पुरस्कार' प्रत्येकासाठी खास आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच माझा पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
माझा पुरस्कार सोहळा म्हणजे सबकुछ मुळ्ये काका. पुरस्कार कोणाला द्यायचा हे मुळ्ये काकाचं ठरवतात. एकाधिकारशाही असूनही हा पुरस्कार सोहळा चांगला गाजतो. दरवर्षी कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.
संबंधित बातम्या