कैरो (इजिप्त) : कैरोतील ‘ऑपेरा हाऊस’मध्ये मंगळवारी 38 व्या ‘कैरो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’ची (CIFF) सुरुवात झाली. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात हिंदी सिनेसृष्टीच्या सन्मानार्थ एक व्हिडीओ दाखवण्यात आला. यावेळी हिंदी सिनेसृष्टीमधील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.
इजिप्तमधील प्रसिद्ध दिग्दर्शक खालिद गलल यांनी हिंदी सिनेसृष्टीच्या सन्मानार्थ तयार करण्यात आलेल्या व्हिडीओचं दिग्दर्शन केले. प्रसिद्ध गायिका नेसमा महजोब यांनी यामध्ये एक गाणं गायलं असून, ज्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.
कैरो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी खास तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, ऋषी कपूर, सलमान खान, फराह खान यांसारख्या दिग्गजांच्या नावासह फोटोंचा समावेश होता.
24 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये भारतातून तीन सिनेमांनी सहभाग घेतला आहे. द नॅरो पाथ, हाफ तिकीट हे दोन सिनेमे इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये दाखवले जाणार असून, ‘लिपस्टिक अंड माय बुरका’ हा सिनेमा फेस्टिव्हल ऑफ फेस्टिव्हल्स कॉम्पिटिशनमध्ये दाखवला जाणार आहे.