Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता अंकुर वाढवे (Ankur Wadhave) घराघरांत पोहोचला आहे. एकीकडे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या कार्यक्रमाचे चाहते नाराज झाले आहेत. पण या कार्यक्रमातील छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवे (Ankur Wadhave) आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. 


यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अंकुर वाढवेने प्रायोगिक रंगभूमीच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पुढे एकांकिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करू लागला. पण छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला.


सिनेमात दिसणार प्रमुख भूमिकेत (Ankur Wadhave Movie) 


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंकुर वाढवे विनोदवीर म्हणून ओळखला जाऊ लागला. पण आता आगामी सिनेमाच्या माध्यमातून तो रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. अंकुरने आजवर अनेक सिनेमांत काम केलं असलं तरी त्याच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात अंकुर पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून अंकुरचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. 


आपली प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाबद्दल बोलताना अंकुर वाढवे म्हणाला,"मी याआधी केलेले सर्व सिनेमे विनोदी होते. पण आगामी सिनेमाचा जॉनर वेगळा आहे. हा सिनेमा सटायर पद्धतीचा आहे. मी याआधी वेगवेगळी पात्र साकारली आहेत. पण हा सिनेमा वेगळा आहे. माझी प्रमुख भूमिका असल्याने माझ्यासाठी हा सिनेमा खूपच खास आहे". 


अंकुर पुढे म्हणाला,"आगामी सिनेमाचं दिग्दर्शन रवींद्र शिवाजी यांनी केलं आहे. तर चैतन्य पिसाळने या सिनेमाची कथा लिहिली आहे. चैतन्यने मला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात पाहिलं आणि त्याला या सिनेमाची गोष्ट सुचली आहे. मी विनोदी अभिनेता असण्यासोबत कसलेला कलाकार आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने मला डोळ्यासमोर ठेऊन या सिनेमाची गोष्ट लिहिली. माझ्यासारख्या कमी उंचीच्या एका विनोदी अभिनेत्याला मुख्य भूमिकेसाठी विचारणा होण्याची ही पहिलीच वेळ आहे". 


अंकुर वाढवेसोबत त्याच्या आगामी सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेदेखील (Rohit Mane) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सतीश नाईक आणि समीर खान या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 


अंकुर वाढवेबद्दल जाणून घ्या... (Who is Ankur Wadhave)


अंकुर वाढवेने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्कीट हाऊस, आम्ही सगळे फर्स्ट क्लास, निम्मा शिम्मा राक्षस, कन्हैया, वासूची सासू अशा अनेक नाटकांत काम केलं आहे. तर जलसा आणि गावठी या सिनेमांतही झळकला आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप? समोर आलं मोठं कारण