मुंबई : पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे. इतिहास नाही, तर काल्पनिक कवी पद्मावत यांची कलाकृती हा चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले.


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटात एकही कट सुचवलेला नाही, अशी माहितीही प्रसून जोशी यांनी दिली. चित्रपटाला 'यू/ए' सर्टिफिकेट मिळावं, यासाठी पाच बदल सुचवले असल्याचं जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केलं.

पद्मावती चित्रपटाच्या रीलिजवर गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेचं सावट आहे. मात्र सीबीएफसीने स्थापन केलेल्या समितीशी चर्चा केल्यानंतर यावर तोडगा निघण्याची चिन्हं आहेत. सुचवलेले बदल दिग्दर्शकाने अंमलात आणल्यास चित्रपटाला 'यू/ए' सर्टिफिकेट मिळेल. म्हणजेच 12 वर्षांखालील मुलांना पालकांच्या सोबतीने हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येईल.

'सीबीएफसीने पद्मावती चित्रपटाला एकही कट सुचवलेला नाही. त्याचप्रमाणे चित्रपटापूर्वी डिस्क्लेमर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. चित्रपटातील ऐतिहासिक घटना अचूक असल्याचा कोणताही दावा आम्ही करत नाही, अशी सूचना सिनेमाआधी देणं आवश्यक आहे.' असं प्रसून जोशींनी सांगितलं.

सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं आहे.

घुमर या गाण्यातही बदल करण्याची सूचना सीबीएफसीने दिली आहे. चित्रपटात दाखवलेल्या व्यक्तिरेखेचं वर्णन साजेसं व्हावं, यासाठी हा बदल सुचवल्याचं जोशींनी सांगितलं. ऐतिहासिक वास्तूंशी निगडीत अयोग्य /दिशाभूल करणारे संदर्भ बदलून घ्यावेत, असंही सेन्सॉर बोर्डाने सुचवलं आहे.

आम्ही सुचवलेले बदल 'पद्मावती'चे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मान्य केले आहेत, अशी माहितीही प्रसून जोशी यांनी दिली.

विरोधामुळे प्रदर्शन लांबणीवर

करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.

'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं.

केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाच्या बैठकीत निर्णय

केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने चित्रपट पाहिल्यानंतर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाशी संबंधित वाद संपावा, असा यामागचा उद्देश आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विशेष समितीमध्ये उदयपूरचे अरविंद सिंह मेवाड, डॉ. चंद्रमणी सिंह, जयपूर विद्यापीठाचे प्राध्यापक के.के सिंह यांचा समावेश होता. 28 डिसेंबरला सेन्सॉर बोर्डाची बैठक झाली.

सेन्सॉर बोर्डाची पुढील बैठक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल, असं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे.

पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...


पद्मावती हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी सहा सदस्यीय समितीला निमंत्रित केलं होतं. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं.

'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.

दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत

राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

पद्मावती मार्चमध्ये?

पद्मावती सिनेमाचं रीलिज मार्च महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 'पद्मावती'पूर्वी विविध भाषांतील जवळपास 40 चित्रपट रांगेत आहेत. वर्षअखेर असल्यामुळे चित्रपट मंडळाचे काही सदस्य सुट्टीवर आहेत, तर काही जण आजारी आहेत.

न्यायालयानं पद्मावती सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावली होती. सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. यावेळी पद्मावती सिनेमासंदर्भात जाहीर मतप्रदर्शन करणाऱ्या मंत्र्यांना सेन्सॉरच्या नियमांचं उल्लंघन न करण्याची ताकीदही सुप्रीम कोर्टानं दिली होती.


संबंधित बातम्या


'पद्मावती'चं भविष्य इतिहासतज्ज्ञांच्या हाती, मार्चमध्ये रिलीज?

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं