मुंबई : अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणारा ‘सत्यमेव जयते’ हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमात शिया मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपच्या सय्यद अली जाफरी यांनी सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली.


‘सिनेमात वादग्रस्त दृश्य दाखवण्यात आली आहेत. ज्यातून शिया मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या,’ असा दावा ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर पाहिल्यानंतर जाफरी यांनी केला आहे. ही तक्रार हैद्राबादमधील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली.

‘सिनेमाचे निर्माते असलेल्या एमी एंटरटेनमेंट आणि अन्य काही व्यक्तींवर कलम 295 (अ) आणि सिनेमॅटोग्राफ अधिनियमाशी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ‘सत्यमेव जयते’चे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं असून हा सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. सिनेमात जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी आणि आयशा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.