चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षी सिन्हाच्या मुंबईतल्या घरी
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2019 04:22 PM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा आगामी चित्रपट 'खानदानी शफाखाना'च्या प्रदर्शनात सध्या व्यस्त आहे. परंतु यादरम्यान तिला एक जोरदार धक्का बसला आहे.
Sonakshi Sinha
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा आगामी चित्रपट 'खानदानी शफाखाना'च्या प्रदर्शनात सध्या व्यस्त आहे. परंतु यादरम्यान तिला एक जोरदार धक्का बसला आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्याविरोधात उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील कटघर पोलीस ठाण्यात कलम 420 (फसवणूक ) आणि कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आज सोनाक्षीच्या मुंबई येथील घरी दाखल झाले आहेत. 2018 मध्ये एका स्टेज परफॉर्मन्ससाठी सोनाक्षीने 24 लाख रुपये घेतले होते. परंतु पैसे घेतल्यानंतरही ती कार्यक्रमात सहभागी झाली नाही. या केससंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस सोनाक्षीच्या जुहू येथील रामायण बंगल्यावर दाखल झाले. परंतु यावेळी सोनाक्षी तिच्या घरी नव्हती. दरम्यान, मुरादाबादमधील शिवपुरी येथील स्थानिक प्रमोद शर्मा यांनी 24 नोव्हेंबर रोजी कटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षी विरोधात तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी आलो असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे की, "मागील वर्षी 30 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया फॅशन अॅण्ड ब्यूटी अवॉर्ड कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत आम्ही सोनाक्षीसोबत करार केला होता. कार्यक्रमासाठीचे मानधन तिला देण्यात आले होते. त्यानंतरही ती कार्यक्रमात सहभागी झाली नाही." तक्रारदार प्रमोद यांनी यासाठी टॅलेंट फुल ऑन या कंपनीशी करार केला होता. प्रमोद म्हणाले की, "या कार्यक्रमासाठी मी स्वतः सोनाक्षीची खासगी सचिव मालविका पंजाबी हिच्याशी बातचित केली होती. त्यानंतर मी सोनाक्षीच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले होते. परंतु ऐन वेळी सोनाक्षीने या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला."