चेन्नई : चेन्नईतील एका व्यापाऱ्याने बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनसह आठ जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. हृतिकच्या प्रसिद्ध ब्रॅन्डच्या मार्केटिंगचा हा वाद आहे. याप्रकरणी हृतिक विरोधात यावर्षी जूनमध्ये कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हृतिकच्या ब्रँडच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी स्टॉकिस्ट म्हणून त्याची नियुक्ती केलेल्या आर. मुरलीधरनने याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी हृतिक रोशनला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला उत्तर देताना हृतिकने म्हटलं की, "ब्रँडचे काही प्रोडक्ट्स दिल्ली आणि मुंबईच्या इतर कंपन्याना असाईन करण्यात आले होते. त्यामुळे मुरलीधरनचं जे नुकसान झालं आहे, त्यासाठी मी जबाबदार नाही."

मुरलीधरनने दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीने हृतिकच्या ब्रँडच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी स्टॉकिस्ट म्हणून त्याची नियुक्ती केली होती. मात्र हृतिकच्या कंपनीच्या ब्रँडचे कोणतेही प्रोडक्ट्स पुरवले नाही आणि कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण मार्केटिंग टीम रद्द केली. हृतिक आणि त्याच्या सहकाऱ्यांमुळे आपल्याला 21 लाखांचं नुकसान झाल्याचं मुरलीधरनने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

मुरलीधरनने डिसेंबर 2014मध्ये याबाबत तक्रार दाखल केली. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हृतिक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात जून महिन्यात गुन्हा दाखल केला आहे.