Anil Kapoor:  बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor)  यांनी नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अनिल कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  अनेक मोठ-मोठे चॅनेल हे अनिल कपूर यांच्या नावाचा, आवाजाचा,  फोटोचा परवानगी न घेता वापर करतात. त्यामुळे या वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन करण्यावर कायमस्वरूपी अभिनेत्याने मनाई हुकूम मागितला. अनिल कपूर यांच्या या याचिकेवर आता दिल्ली उच्च न्यायालयानं  सुनावणी  केली आहे. आता अनिल कपूर यांच्या आवाज, फोटो आणि डायलॉग्सचा वापर करताना त्यांच्यापरवानगीशिवाय करता येणार नाही.


याचिकेत अनिल कपूर यांनी मागणी केली होती की, लोक त्यांच्या नावाचा, फोटोचा  पैशासाठी वापरत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज आणि फोटो वापरण्यावर बंदी घातली पाहिजे. अनिल कपूर यांनी अनेक वेबसाइट्स आणि फोरम्सविरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी सांगितलं की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य संरक्षित आहे यात शंका नाही, परंतु जेव्हा ते मर्यादा ओलांडते आणि एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अधिकार धोक्यात आणते तेव्हा ते बेकायदेशीर ठरते.'






न्यायालयाने म्हटले की, "नाव, आवाज, संवाद आणि छायाचित्रे बेकायदेशीरपणे आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अशा गैरवापराकडे न्यायालय डोळेझाक करू शकत नाही. म्हणून, प्रतिवादी क्रमांक 1 ते 16 वादी अनिल कूपर यांचे नाव, आवाज किंवा इतर व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये व्यावसायिक फायद्यासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही प्रकारे वापरण्यास बंदी केली जात आहे.”


तसेच हायकोर्टाने अज्ञात लोकांना आक्षेपार्ह लिंक प्रसारित करण्यापासून रोखले आहे. न्यायालयाने म्हटले की, 'एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धीबरोबरच तोटाही सहन करावा लागतो आणि या प्रकरणावरून असे दिसून येते की "प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीमुळे नुकसान देखील होऊ शकते.'


अनिल कपूर यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांचा जुग जुग जियो हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.


संबंधित बातम्या:


Anil Kapoor : नावाचा होतोय गैरवापर; अनिल कपूरची कोर्टात धाव, दिल्ली उच्च न्यायालयात होणार सुनावणी