मुंबई : अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या वादावर आधारित आगामी सिनेमा 'रामजन्म भूमी' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सेन्साॅर बोर्डानं अशा संवेदनशील धार्मिक विषयावर आधारित सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलीच कशी? असा सवाल या याचिकेत विचारण्यात आला आहे. हा सिनेमा प्रदर्शित करण्याला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावणारी अनेक दृश्य आणि संवाद सिनेमात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
अझहर तांबोळी नावाच्या एका समाजसेवकाच्यावतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. हसनैन काझी यांनी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर केली. येत्या ४ डिसेंबरला यावर प्राथमिक सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलंय. यावेळी याचिकेतील प्रतिवादींना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.


शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हा सिनेमा बनवला असून, रिझवी स्वत: यातील कथेचे लेखक आहेत. मनोज जोशी आणि गोंविद नामदेव यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमानं देशातील वातावरण बिघडेल त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.