मुंबई : बॉलीवूडमधला यंदाचा मोस्ट अवेटेड चित्रपट 2.0 उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत हे दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने 2.0 च्या सेटवरील किस्से सांगितले.
अक्षयला रजनीकांत यांच्याकडून काय शिकलास, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने उत्तर दिले, मराठी! अक्षय म्हणाला की, मी आणि रजनीकांत सर सेटवर नेहमी मराठीत बोलायचो. रजनीकांत स्वत: महाराष्ट्रीय आहेत. मलाही थोडीफार मराठी बोलता येते. त्यामुळे आम्ही दोघे सेटवर नेहमी मराठीत बोलायचो.
अक्षय कुमारला मराठी बोलता येतं, हे एव्हाना सर्वांना माहीत आहे. अनेक मुलाखती, मराठी कार्यक्रमांना अक्षयने हजेरी लावली आहे. त्या-त्या वेळी अक्षय चांगलं मराठी बोलताना दिसला. त्यामुळे अक्षय आणि रजनीकांत यांचं मराठी संभाषण नक्कीच चांगलं झालं असणार यात शंका नाही.
रजनीकांत यांच्यासोबतचे अनेक किस्से अक्षयने यावेळी सांगितले. अक्षय म्हणाला की, रजनीकांत यांना कोणताही साधं वाक्य दिले तरी, ते त्याला एखाद्या मोठ्या डायलॉगप्रमाणे तुमच्यासमोर सादर करतील. ही त्यांची खासियत आहे.