CAA Protests | ट्वीटमुळे अभिनेता फरहान अख्तरविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2019 08:26 AM (IST)
फरहान अख्तरवर आरोप आहे की, त्याने जनतेमध्ये भीती आणि अराजकता पसरवण्यासोबत मुस्लीम, तृतीयपंथी, नास्तिक आणि दलितांना देशाविरोधात भडकावण्याचं काम केलं आहे. फरहानवर देशातील विविध समाजांमध्ये शत्रूत्वाला प्रोत्साहन दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. यातच बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने 18 डिसेंबर रोजी ट्वीट करुन सीएएविरोधात आवाज बुलंद केला. पण नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. हैदराबादमधील सैदाबादमध्ये त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 121 (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण किंवा प्रोत्साहित करणं), 121 अ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणं), 120 ब (गुन्हेगारी कट रचणं) आणि 505 (समाजामध्ये तेढ निर्माण करणं) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. के करुणा सागर असं तक्रारदाराचं नाव आहे. के करुणा सागर हे पेशाने वकील असून हिंदू संघटनेचे अध्यक्षही आहेत. फरहान अख्तरने देशविरोधी ट्वीट केल्याचा आरोप या वकिलाने केला आहे. फरहान अख्तरवर आरोप आहे की, "त्याने जनतेमध्ये भीती आणि अराजकता पसरवण्यासोबत मुस्लीम, तृतीयपंथी, नास्तिक आणि दलितांना देशाविरोधात भडकावण्याचं काम केलं आहे." तसंच फरहानवर देशातील विविध समाजांमध्ये शत्रूत्वाला प्रोत्साहन दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. फरहान अख्तरने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्याने CAA/CAB ची सविस्तर माहिती दिली होती. सोबत लिहिलं होतं की, "हे आंदोलन का गरजेचं आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज आहे. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात 19 डिसेंबरला भेटूया. सोशल मीडियात एकट्याने आंदोलन करण्याचा काळ आता संपला आहे." यानंतर दोन दिवसांनी त्याने मुंबई पोलिसांचे आभार मानण्यासाठी ट्वीट केलं होतं. त्याने लिहिलं होतं की, "शांततापूर्वक आंदोलनासाठी मुंबईला शाबासकी आणि लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे आभार." सीएएविरोधात उभे राहिलेले सेलिब्रिटी फरहान अख्तरशिवाय नागरिकत्व दुरुस्त कायद्याला बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना, राजकुमार राव, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, स्वरा भास्कर, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही विरोध केला आहे.