Boyz 3 : 'बॉईज', 'बॉईज 2' नंतर आता 'बॉईज 3' लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर 'बॉईज 3'चा म्युझिकल अल्बम चांगलाच चर्चेचा विषय ठरला. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज ३' चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. 'बॉईज' व 'बॉईज 2' मधील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 'लग्नाळू', 'गोटी सोडा' ही गाणी डान्स, पार्टी अँथम बनली असून आताच नवीन आलेल्या 'लग्नाळू 2.0' ने पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे. 


'बॉईज 3' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्यात भव्य दिव्य म्युझिकल सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 'बॉईज ३' भव्य म्युझिकल सोहळ्यात चित्रपटातील सुपर हिट गाण्यांची मैफिल रंगली होती. हजारो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, सांगितिक वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला कमालीचे गायक यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी आनंददायी ठरली. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते सह अनेक गायकांचा सहभाग होता तसेच नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढली. 


संगीत सोहळ्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात,"बॉईज' व 'बॉईज 2' ला जसं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तसंच 'बॉईज ३' ला ही मिळेल याची खात्री आहे. 'बॉईज ३'ची ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे, त्यावर चर्चा होत आहे याचा मला आनंद आहे. 'बॉईज 3' चित्रपटातील गाण्यांवर लोक थिरकत  आहेत. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत. लवकरच सर्व गाणी प्रेक्षकांच्या समोर येतील. 'बॉईज ' व 'बॉईज २'ला  प्रेक्षकांचा जसा उत्तम प्रतिसाद मिळाला तसाच 'बॉईज 3'च्या अल्बमला देखील मिळेल, अशी आशा मला आहे."


सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज 3' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 16 सप्टेंबर रोजी ‘बॅाईज 3’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: