मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन तगड्या सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळाली. किंग खान शाहरुखचा 'रईस' आणि डान्सिंग सेन्सेशन हृतिक रोशनचा 'काबिल' हे दोन चित्रपट भिडले. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता 'रईस'च रईस ठरण्याची चिन्हं आहेत.


यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'काबिल' सिनेमाने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला 'काबिल' सूडपटाचा प्रवास मांडतो.

25 जानेवारी म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होऊनही काबिलने बऱ्यापैकी गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे रईस सारख्या तगड्या चित्रपटाची टक्कर असतानाही तो बॉक्स ऑफिसवर 'काबिल' ठरला आहे. 'काबिल'चा मल्टिप्लेक्समध्ये 40 टक्के शेअर पहिल्या दिवशी होता, तर सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येही त्याचा शेअर कमी होता.

दुसरीकडे शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने पहिल्याच दिवशी छप्पर फाडके कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली, तरी रईसने पहिल्या दिवशी 21 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केल्याचं म्हटलं जातं. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला रईस क्राईम थ्रिलर आहे.

https://twitter.com/_SanjayGupta/status/824503690354503680
रईस देशभरातील 2700 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ओपनिंग डे साठी रईसला 65 टक्के अॅडव्हान्स बुकिंग मिळालं होतं. म्हणजेच अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 13 कोटींचा गल्ला रईसने कमावला होता. बुधवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने बुधवार ते रविवार असा पाच दिवसांचा एक्स्टेंडेड विकेंड मिळणार आहे. त्यामुळे काबिल आणि रईसच्या स्पर्धेत रईसच सरस ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.