पुणे : मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग अडचणीत येण्याची शक्यता आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत पुष्करवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्कर जोग हा पुण्यातील सुप्रसिद्ध जोग क्लासेसचे संचालक डॉ. सुहास जोग यांचा मुलगा. तक्रारकर्ता नरेश चव्हाण हे जोग एज्युकेशनल ट्रस्टमध्ये उपशिक्षक म्हणून नोकरीला होते. जोग ट्रस्टने चव्हाण यांना बडतर्फ केलं, त्याचप्रमाणे त्यांच्याबाबत खोटी माहिती शासनाला दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नरेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर पुण्याच्या कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये पुष्कर जोगविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्कर जोगने बाल कलाकार म्हणून 'राजू' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता. त्यानंतर 2007 मध्ये महेश कोठारेंच्या 'जबरदस्त' या चित्रपटातून त्याने पुनर्पदार्पण केलं. पुष्करचे सत्य, धूम 2 धमाल, सासूचं स्वयंवर हे मराठी, तर जाना पेहचाना, ईएमआय हे हिंदी चित्रपट गाजले आहेत. याशिवाय केसरी अराऊंड द वर्ल्ड, एकापेक्षा एक, झुंज मराठमोळी, महाराष्ट्राचं नच बलिए अशा टीव्ही कार्यक्रमांमध्येही पुष्कर झळकला होता.