पणजी : कपूर घराण्याच्या तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी चित्रपट निर्माते बोनी कपूर दिग्दर्शनात उतरणार आहेत. त्यांच्या या सिनेमात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी बुधवारी पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तशी इच्छा बोलून दाखवली. 'कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स' या कार्यक्रमात बोनी कपूर आणि जान्हवी कपूर ही बाप-बेटीची जोडी उपस्थित होती.


भविष्यात कपूर कुटुंबियांना घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.


या वेळी बोनी कपूर यांनी तांबे युग, चंदेरी युग, सुवर्ण युग आणि आता हीरकयुग सुरू असल्याचे सांगून पूर्वीपेक्षा या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक पध्दती बदलल्याचे सांगितले. पूर्वी 50-60 सिनेमाघरात चित्रपट प्रदर्शित होत होते, आज ठग्ज ऑफ हिंदुस्थानसारखा चित्रपट 7000 सिनेमाघरात प्रदर्शित झाला आणि चीनमध्येही प्रदर्शित होतोय, असे सांगून भानू अथैय्या, ए. आर. रेहमान, रस्सूल पकूटी यांची उदाहरणे देत भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या ऑस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.


लेखकांची बॉलिवूडला गरज होती, आजही आहे
बोनी कपूर यांनी पूर्वीही लेखकांची बॉलिवूडला गरज होती आणि आजही आहे असे सांगून लेखकांना कथा, संकल्पना पाठविण्याचे आवाहन केले.  यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शकांशी लेखकांनी संपर्क साधावा. चांगल्या संकल्पनेवरील कथानकावर चित्रपट काढता येईल, असे आवाहन बोनी कपूर यांनी केले. अर्जुन कपूर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होता, मात्र त्याच्या पानिपत या चित्रपटातील त्याचा लूक जाहीर होऊ नये, यासाठी त्याचे दिग्दर्शक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अर्जुन आज उपस्थित राहू शकला नाही.


श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश
मुलाखती दरम्यान जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश झाले. जान्हवी कपूरने तिच्यावर केलेली कविता सादर करुन तिच्याप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावू आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु असे सांगितले. आईच्या मृत्यूनंतर आमचा परिवार एक झाल्याचे तिने सांगितले.  ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा,अशी खंत बोनी कपूर यांनी व्यक्त केली.