मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला नोटीस बजावत हायकोर्टानं भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मनाई करण्यात आलेल्या कमाल खाननं कोर्टाच्या निर्देशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टानं सलानला दिले आहेत.


सलमानच्या 'राधे' या सिनेमासह सलमानच्या व्यक्तिगत आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी आणि अन्य सर्वच बाबतीत कमाल खाननं अनेकदा वादग्रस्त पोस्ट समाज माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे सलमाननं शहर दिवाणी सत्र न्यायालयात याविरोधात याचिका करुन कमाल खानला त्याच्याबद्दल कोणतीही पोस्ट लिहिण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. दिवाणी न्यायालयाने ही मागणी मान्य करत अंतरिम मनाई करणारा आदेश जारी केलेला आहे. याविरोधात केआरकेनं आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सिनेकलावंताविरोधात आणि त्यांच्या सिनेमांवर समिक्षक टीकात्मक लिहू शकत नाही का? सलमानला त्याच्यावरील टीकांबाबत एवढा आक्षेप का आहे? असे प्रश्न या याचिकेत उपस्थित केले आहेत. तसेच अश्याप्रकारे कनिष्ठ न्यायालय सरसकट मनाई करु शकत नाही. हा आपल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याची प्रमुख मागणी याचिकेतून केलेली आहे.


या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी झाली. तेव्हा प्राथमिक सुनावणीनंतर हायकोर्टानं सलमानला नोटीस बजावली असून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर दोन आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.


काय आहे प्रकरण?
सलमान खान आणि कमाल आर खान म्हणजेच केआरके यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. केआरकेने त्याच्या युट्युब व्हिडिओमध्ये सलमानवर अनेक आरोप केले होते ज्याचा विरोध म्हणून सलमानने केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. केआरकेने सलमानच्या 'राधे'ला निगेटिव्ह रिव्यू दिला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वीही केआरकेने चित्रपटाच्या विरुद्ध अनेक ट्वीट केले होते. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये सलमानवर अनेक आरोप देखील केले. त्याने 'बिईंग ह्युमन फाऊंडेशन' ला खोटं सांगत पैसे उकळण्याचं एक माध्यम म्हटलं होतं. सलमानच्या कंपनी विरुद्ध चुकीची माहिती पसरवल्यामुळे सलमानने केआरकेविरुद्ध तक्रार दाखल केली.