मुंबई : सलमान खान आणि भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया' या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली. चित्रपटासोबतच या दोघांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतरही या दोघांची जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. सलमान खान आज एक बॉलिवूडमधील नावाजलेला चेहरा आहे, परंतु, भाग्यश्री या चित्रपटानंतर रूपेरी पडद्यावर दिसलीच नाही. आता भाग्यश्री पडद्यावर परतणार आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये भाग्यश्री दिसून येणार आहे.



लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच चित्रपटांचे शुटींग बंद आहेत. अशातच भाग्यश्रीने एका इंटरव्ह्यूमधून एका फोटोशूटबाबत गौप्यस्पोट केला होता. तिने एका वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, 'एका फोटोग्राफरने सलमान खानसोबत किसिंग सीन देण्यास सांगितले होते. फोटोग्राफरला तिचे आणि सलमानचे काही हॉट फोटो काढायचे होते. शूट सुरु होण्याआधी फोटोग्राफर सलमान खानला बाजूला घेऊन गेले आणि भाग्यश्रीसोबत किसिंग सीन देण्यास सांगितला. ते ऐकून ती हैराण झाली.


पाहा भाग्यश्रीचा फिटनेस व्हिडीओ :



भाग्यश्रीने सांगितले की, त्यावेळी ती फार घाबरली होती. परंतु, सलमान खानचं उत्तर ऐकून ती शांत झाली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. यासंदर्भात बोलताना भाग्यश्रीने सांगितले की, 'सलमानने फोटोग्राफरला असं करण्यास विरोध दर्शवला. तसेच भाग्यश्रीच्या परवानगीशिवाय असं काहीही करणार नाही, असंही सांगितलं. हे ऐकून आनंद झाला आणि सलमानसोबत काम करताना सुरक्षित असल्याचं वाटलं, असंही भाग्यश्रीने सांगितलं. दरम्यान, भाग्यश्रीने या चित्रपटानंतर इतर कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही.