Bollywood Movie : संपूर्ण देशात जरी चित्रपटगृहे सुरु असली तरी बॉलिवूडकरांची नजर मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहांकडे असते. याचे कारण म्हणजे चित्रपटांचा सगळ्यात मोठा व्यवसाय हा मुंबई आणि महाराष्ट्रातच होतो. त्यामुळे जरी देशभरात चित्रपटगृहे सुरु झाली असली तरी बॉलिवूड निर्मात्यांचे लक्ष महाराष्ट्राकडे होते. महाराष्ट्रात चित्रपटगृहे कधी सुरु होतात याची वाट निर्माते पाहात होते आणि म्हणूनच जरी दुसरीकडे चित्रपटगृहे सुरु असली तरी मोठे निर्माते आपले सिनेमे तेते रिलीज करण्यास उत्सुक नव्हते. ज्यांचा ओटीटीबरोबर करार झाला होता त्यांनीच फक्त आपले सिनेमे तेथे रिलीज केले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात चित्रपटगृहे सुरु करण्याची घोषणा केली आणि बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.


मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याबरोबर बॉलिवूडच्या निर्मात्यांनी प्रत्येक शुक्रवार वाटून घेतला आणि आपल्या सिनेमाच्या रिलीजच्या तारखा घोषित करून टाकल्या. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर दोनच दिवसाच १६ मोठ्या चित्रपटांच्या रिलीजची घोषणा करण्यात आली. आणि आता तर पुढील वर्षीच्या डिसेंबरपर्यंत मोठ्या सिनेमांनी रिलीजच्या तारखा बुक करून टाकल्या आहेत.


संजय लीला भन्साळीने त्याचा बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ ६ जानेवारी २०२२ रोजी रिलीज करण्याची घोषणा केली तर अजय देवगणनेही त्याच्या बहुचर्चित ‘मैदान’ सिनेमाच्या रिलीजची घोषणा करीत पुढील वर्षी जूनमध्ये सिनेमा रिलीज करणार असल्याचे जाहीर केले आहे. खरे तर राज्य सरकारने अजून चित्रपटगृहांबाबतची नियमावली जारी केलेली नाही. पण राज्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले लसीकरण पाहाता १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरु होतील असा विश्वास चित्रपट निर्मात्यांना आहे.


काही चित्रपट निर्मात्यांनी अगोदर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेऊन राज्यात चित्रपटगृहे सुरु करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्मात्यांची बैठक झाली. या बैठकीला संजय राऊतही उपस्थित होते. आणि या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची घोषणा केली.


या घोषणेनंतर लगेचच निर्मात्यांनी चित्रपट रिलीजच्या तारखा घोषित करून टाकल्या. याचे एकमेव कारण म्हणजे चित्रपटांचा सगळ्यात जास्त व्यवसाय हा मुंबई, महाराष्ट्रातच होतो. गेल्य़ा दीड वर्षांपासून चित्रपटगृहं बंद असल्यानं चित्रपट निर्मात्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. मात्र मुंबईत चित्रपटगृहे सुरु झाल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे व्यवसाय होईल असा विश्वास निर्मात्यांना आहे.


३१ डिसेंबर २०२१ पर्यंत जवळ जवळ दहा मोठे चित्रपट रिलीज केले जाणार असून यात अक्षयकुमारच्या ‘सूर्य़वंशी’पासून ८३ वर्ल्ड कपवर आधारित रणवीर सिंह अभिनीत ‘८३’ सिनेमाचा आणि शाहीद कपूरच्या ‘जर्सी’ सिनेमाचाही समावेश आहे.


आतापर्यंत पुढील वर्षीसाठी २० मोठ्या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षीची सुरुवात ‘गंगुबाई काठियावाडी’ने होणार असून जानेवारीतच प्रभासचा ‘राधेश्याम’. अक्षयकुमारचा ‘पृथ्वीराज’, जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ रिलीज केला जाणार आहे. तर आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’ व्हॅलेंटाईन डेला रिलीज केला जाणार आहे. त्यानंतर ‘शमशेरा’, ‘बच्चन पांडे’, ‘रॉकेट्री’, ‘केजीएफ २’, ‘हीरोपंती’, ‘आदिपुरुष’, ‘रामसेतू’ चित्रपटही रिलीज केले जाणार असून डिसेंबर २०२२ मध्ये टायगर श्रॉफचा ‘गणपत’ रिलीज केला जाणार आहे. याशिवाय आणखीही काही चित्रपट रिलीज केले जाणार असून यात नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘झुंड’चाही समावेश आहे.


एकूणच बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.