Ek thi begum 2 series : "एक थी बेगम" या एमएक्स प्लेअर ओरिजनलच्या वेब सीरिजला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एमएक्स प्लेअर ओरिजनल 'एक थी बेगम'चे  दुसरे पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. "एक थी बेगम"चे दुसरे पर्व सचिन दरेकर आणि विशाल मोढावे यांनी दिग्दर्शित केले आहे. शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसाटकर, नझर खान,हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा,  लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णानदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्या "एक थी बेगम 2" मध्ये प्रमुख भूमिका आहेत. 


एक थी बेगमच्या दुसऱ्या पर्वाची सुरूवात लीला पासवानच्या शोधाने सुरू होते. मृत्यूचे सोंग घेतलेली अशरफ, दुबईचा डॉन मकसूदला संपवण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावते. आपला पती झहीरच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेवर ती ठाम राहते. अशरफ स्वत:ला गुन्हेगारी जगतात झोकून देते. 


बंदूक हाताळण्याच्या अनुभवाबद्दल अनुजा साठे म्हणते, "आयुष्यात पहिल्यांदा हातात जेव्हा मी बंदूक घेतली होती .तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते. मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. "एक थी बेगम 2" मधील माझ्या भूमिकेची गरज म्हणून मी बंदूक हाताळली. तो अनुभव खूपच दडपण आणणारा आणि भीतीदायक होता. परंतु तुम्ही जेव्हा सूडाच्या भावनेने पेटलेले असता, तेव्हा हे नगण्य होऊन जाते. शूटिंगच्या सेटवर बंदूक चालवण्याआधी मी प्रशिक्षण घेतले होते, ज्याचा मला निश्चितच फायदा झाला". हातात खरी बंदूक घेऊन चालवणे किती भीतीदायक असू शकते. याची आपल्याला तितकी कल्पना नाही. अनेक देशभक्ती किंवा गॅंगवॉरवर आधारित चित्रपटांमध्ये आपण गुंडांना किंवा दहशतवाद्यांना अगदी सहजरीत्या गोळीबार करताना, रक्तपात घडवताना पाहतो. ते पाहण्यात आपण इतके तल्लीन होऊन जातो की, ते सर्व खोटे आहे याचा देखील विसर पडतो. इतक्या कौशल्याने ते चित्रित केले जाते. 


एमएक्स प्लेअर ओरिजनलच्या "एक थी बेगम 2" या वेबसीरिजची नायिका अनुजा साठेने अतिशय सहजरित्या बंदूक  हाताळली आहे. तिने बंदूक हाताळण्याच्या घेतलेल्या प्रशिक्षणचा तिला उपयोग झालेला आहे. "एक थी बेगम 2" या वेबसीरिजनंतर लवकरच अनेक बड्या कलाकारांच्या वेब सीरिजदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.