मुंबई : हंगामा, बागबान, धूम सारख्या चित्रपटात झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन मोठ्या पडद्यावरुन गायब झाली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात रिमीने आपण अभिनयाला रामराम ठोकल्याचं सांगितलं.
'आता मी अभिनय करणार नाही. खरं तर मला चित्रपट मिळत होते, म्हणून मी काम करत गेले. पण एक वेळ अशी आली, जेव्हा मी फारसं एन्जॉयही करत नव्हते. विनोदी चित्रपट करुन-करुन मी थकले. अखेर मी अभिनय सोडून दिला.' असं रिमीने सांगितलं.
'मी आता दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्राचा विचार करत आहे. चांगली स्क्रिप्ट मिळाल्यास प्रॉडक्शन हाऊस सुरु करणार आहे. मी 'बुधिया सिंह: बॉर्न टू रन' सिनेमाची निर्मिती केली होती. धावपटू बुधियाच्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट होता. 2015 मध्ये त्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यापुढे मात्र मी पूर्णपणे व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करणार आहे.'
रिमी सेनने 2003 मध्ये हंगामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने बागबान, दीवाने हुए पागल, धूम, गोलमाल अनलिमिटेड, फिर हेराफेरी, गरम मसाला, क्योंकि यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 2011 मध्ये आलेला शागिर्द हा तिचा अखेरचा बॉलिवूडपट होता.
रिमी 'बिग बॉस'च्या आठव्या सिझनमध्येही झळकली होती. गेल्या वर्षी पंजाब निवडणुकांपूर्वी रिमीने भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता.