ऋषी कपूर यांचं पुन्हा ट्विटास्त्र, काँग्रेसला 'अमर-अकबर-अँथोनी' गाण्याचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2016 06:21 AM (IST)
मुंबई : केंद्रात मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाले. मोदी सरकारने आपल्या या द्वितीय वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव चर्चेत आहे. मात्र त्यावरुन काँग्रेसने बच्चन आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर 'ट्विटास्त्र' सोडलं आहे. यासाठी त्यांनी गाजलेला चित्रपट अमर-अकबर- अँथोनी या सिनेमाचा दाखला दिला आहे. ऋषी कपूर म्हणतात, "आता तुम्ही केवळ विनोद खन्ना यांच्यावर टीका करणं बाकी आहे. त्यांनाही वादात ओढलात, तर अमर-अकबर- अँथोनी हे गाणं गाऊ शकाल". अमर-अकबर- अँथोनी या सिनेमात अमरच्या भूमिकेत विनोद खन्ना, अकबर म्हणजे ऋषी कपूर आणि अँथोनीची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. त्यामुळेच ऋषी कपूर यांनी हा दाखला दिला आहे. यापूर्वी ऋषी कपूर यांनी देशभरातील विविध रस्ते, संस्थांना देण्यात आलेल्या गांधी परिवारांच्या नावावरुन टीका केली होती. तेव्हापासून ऋषी कपूर काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, विनोद खन्ना हे भाजपचे पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे या वादात काँग्रेसने त्यांचंही नाव घेतल्यास, ऋषी कपूर यांच्या म्हणण्यानुसार 'अमर-अकबर-अँथोनी' हे गाणं पूर्ण होईल.