बॉलिवूड जगतातून दु:खद बातमी येत आहे, बॉलिवूड स्टार आसिफ बसरा (Asif Basra) यांनी आत्महत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे मक्लोडगंज जोगिवाडा रोडवरील एका कॅफेजवळ आत्महत्या केली आहे. अभिनेत्यानं हे टोकाचं पाऊल का टाकलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. कांगडा पोलीस एसएसपी विमुक्त रंजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.


असिफ बसरा या अभिनेत्याला आपली वेगळी ओळख द्यायची गरज नव्हती. ब्लॅक फ्राय डे, परजानिया आदी अनेक सिनेमांमध्ये छोट्या छोट्या पण आठवणीत राहणाऱ्या भूमिका या कलाकाराने वठवल्या होत्या. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या चित्रपटात इम्रान हाश्मीच्या वडिलांची भूमिकाही त्यांनी साकारली होती. असिफ यांच्या अकस्मात निधनाने बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे.

असिफ यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धरमशालामध्ये मक्लोडगंज भागात असिफ बसरा हे राहात होते. एका ब्रिटिश अभिनेत्रीसोबत ते लिव्ह इन मध्ये अनेक वर्षापासून राहात होते. पण अचानक आज त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. खरंतर आज असिफ यांची सकाळ नेहमीप्रमाणेच झाली होती. आपल्या घरातल्या पाळीव कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी असिफ घराबाहेर पडले. त्यानंतर घरी आल्यानंतर कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्यानेच त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अभिनेत्याची आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे. स्थानिक पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवलं असून, अद्याप आणखी तपास चालू असल्याचं कळतं.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर उठलेला वाद पाहता अशी कोणतीही घटना घडली की पोलीस कोणत्याही निष्कर्षाला सहसा लगेच येत नाहीत. इथेही तसंच झालं आहे. गेल्या काही काळापासून असिफ हे नैराश्यात होते. त्यांना डिप्रेशन आलं असल्याचं बोललं जातं. असिफ यांनी टीव्ही, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे. जब वी मेट, काय पो छे, क्रिश 3, आउटसोर्सिंग, एक व्हिलन, शैतना, कालाकांडी, हिचकी आदी अनेक चित्रपटांतून आपली छाप सोडली होती.

आसिफ बसरा यांच्या कामाविषयी

आसिफ बसरा अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. त्यांच्या चित्रपटांविषयी सांगायचं म्हटलं तर 'परजानिया' आणि 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये काम केले आहे. प्रसिद्ध चित्रपटाबद्दल सांगायचं तर आसिफ 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' मध्ये दिसले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सिरीज 'पाताल लोक' मध्येही त्यांनी काम केलं आहे.