नवी दिल्ली: सलमान खानच्या १८ वर्षापूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणाची सुनावणी सध्या जोधपूर न्यायालयात सुरु असून, याप्रकरणी आज सलमान खानची साक्ष नोंदवण्यात आली. न्यायालयाने यावेळी सलमानला 65 प्रश्न विचारले, त्यावर सलमानने उत्तरं देताना आपण निर्दोष असल्याचे सांगितलं. तर दुसरीकडे सलमानसोबतच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांनाही कोर्टाने हजेरी लावून आपला जबाब नोंदवला.


या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने सलमानला एकूण 65 प्रश्न विचारले यावर सलमाननं उत्तरं देताना वन विभागाने प्रसिद्धिसाठी माध्यमात हा मुद्दा रंगवल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी आपण निर्दोष असून, आपल्याला यामध्ये गोवण्यात येत असल्याचंही तो यावेळी न्यायालयाला सांगितलं.

या प्रकरणावर सैफ आली खानने आपला जबाब नोंदवताना, स्थानिकांच्या साक्षीवरुन मला याप्रकरणात गोवलं जात असल्याचं सांगितलं. आपण कधीही शिकारीला गेलो नाही, त्यामुळे कधीही शिकार केली नसल्याचं त्यानं न्यायालयाला सांगितलं.



यावेळी न्यायालयाने सलमान खानला त्यांचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव, त्याचे वय, आणि व्यवसाय याविषयी विचारले. तसेच तो कुठे राहतो या विषयीही न्यायालयाने विचारल्याचे  वकील रवी पवार यांनी सांगितलं.

या प्रकरणात एकूण 28 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून, आता याप्रकरणातील बॉलिवूडमधील अभिनेते अभिनेत्रींची साक्ष नोंदवली जात आहे.



न्यायमुर्ती दलपत सिंह राजपुरोहित यांच्यासमोर सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू आणि नीलम यांनी आपली साक्ष नोंदवली. आता यावर पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.