मुंबई : बॉक्स ऑफिसवर दोन तगड्या सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळत आहे. किंग खान शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ हे दोन चित्रपट भिडत आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता ‘रईस’च रईस ठरत आहे. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला हा रईस क्राईम थ्रिलर आहे.
शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने दोन दिवसात मिळून 46.72 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. रईसने पहिल्या दिवशी (बुधवार 25 जानेवारी) 20.42 कोटी, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी (गुरुवार) 26.30 कोटींची कमाई केली.
यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘काबिल’ सिनेमाने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी 18.67 कोटी कमवले. म्हणजेच दोन दिवसांची 'काबिल'ची एकूण कमाई 29.10 कोटी झाली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला ‘काबिल’ सूडपटाचा प्रवास मांडतो.
https://twitter.com/taran_adarsh/status/824855275140026368
‘काबिल’चा मल्टिप्लेक्समध्ये 40 टक्के शेअर पहिल्या दिवशी होता, तर सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येही त्याचा शेअर कमी होता. रईस देशभरातील 2700 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ओपनिंग डे साठी रईसला 65 टक्के अॅडव्हान्स बुकिंग मिळालं होतं. म्हणजेच अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 13 कोटींचा गल्ला रईसने कमावला होता.
दोन्ही चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाल्याने बुधवार ते रविवार असा पाच दिवसांचा एक्स्टेंडेड विकेंड मिळणार आहे. त्यामुळे काबिल आणि रईसच्या स्पर्धेत रईसच सरस ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.