मुंबई : गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसंच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’चा आज वाढदिवस आहे. आपल्या सुरांनी जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा आज 85 व्या वाढदिवस आहे.
याचनिमित्ताने आशा भोसले यांच्याशी संबंधित 25 रंजक गोष्टी
1) 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या ‘मेलोडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे.
2) 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती.
3) आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह 20 भाषांमधून गाणी गायली आहेत.
4) तर आपण 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं आशाबाईंनी 2006 मध्ये सांगितलं होतं.
5) गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत.
6) भारत सरकाराने या महान गायिकेचा दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे.
7) आशा भोसले यांनी फक्त गायनातच नाही तर अभिनयातही झलक दाखवली. त्यांनी ‘माई’ चित्रपटात अभिनय केला होता आणि त्यांची कौतुकही झालं होतं.
8) आशा भोसलेंच्या करिअरच्या सुरुवातीला गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या मोठ्या गायिका आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्यात येत असत.
9) आशाताईंना दुसऱ्या दर्जांच्या सिनेमांची गायिका समजलं जात असे. विशेषत: खलनायिका किंवा सहअभिनेत्रींवर चित्रीत केलेली गाणीच त्यांना मिळत असत.
10) आशाताईंनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नाची गाठ बांधली होती.
11) गणपतराव हे लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी होते. त्यामुळे लता मंगेशकरांसह त्यांचं कुटुंब या लग्नाच्याविरोधात होते. पण आशाताई विरोधासमोर झुकल्या नाहीत. यामुळे लतादीदी आणि आशाताई यांच्या संबंधात कटुता आली आणि अनेक वर्ष त्यांच्यात अबोला होता.
12) गणपतराव आणि आशाताई यांना तीन मुलं झाली. सर्वात मोठ्या मुलाचं नाव हेमंत असून तो पायलट होता. त्यानंतर त्याने संगीतकार म्हणून काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वृत्तपत्रांसाठी लेखन करत होती. तर सर्वात लहान मुलगा आनंदने बिझनेस आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आता तो आशाताईंचा व्यवसाय पाहतात. आशा भोसले यांची मुलगी वर्षाने वयाच्या 56 व्या वर्षी 2012 मध्ये आत्महत्या केली होती.
13) गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशाताईंनी महान संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्यासोबत संसार थाटला. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं.
14) आशा भोसले उत्तम गायिका तर आहेतच सुगरणही आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नेहमीच चिकन-मटण आणि बिर्याणी बनवून आणण्याची मागणी करत.
15) एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या की, जर गायिका म्हणून यशस्वी झाले नसते तर मी कूक नक्कीच झाले असते.
16) आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा बिझनेस जबरदस्त चालतो. दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचे रेस्टॉरंट आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांचे रेस्टॉरंट आहेत.
17) रेस्टॉरंटची सजावट आणि तिथल्या जेवणाकडे आशाताईंचं विशेष लक्ष असतं. तिथल्या शेफना त्यांनी सुमारे सहा महिन्यांचं ट्रेनिंग दिलं आहे
18) आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूक रसेलं स्कॉट यांनी आशा ब्रॅण्डचे अधिकार ब्रिटनसाठी खरेदी केले आहेत. त्यांच्या प्लॅनिंगनुसार पाच वर्षांमध्ये ‘आशा’ नावाचे 40 रेस्टॉरंट उघडले जातील.
19) बालपणी आशा त्यांची मोठी बहिण लता मंगेशकर यांच्या अतिशय जवळ होत्या. लतादीदी आशा भोसलेंना शाळेत घेऊन जात असत. पण एकीच्या फीमध्ये दोघींना शिकवू शकत नसल्याचं शिक्षकाने सांगितलं आणि यामुळे लतादीदींनी शिक्षण सोडलं.
20) ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडीकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं.
21) आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. 1979 मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी स्वत:चं नामांकन नाकारलं, कारण नव्या गायकांना संधी मिळावी. आशा यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.
22) अदनान सामी जेव्हा दहा वर्षांचे होते तेव्हा आशाताईंनी त्याला गाण्यात करिअर करण्याचा सल्ला दिला होता.
23) आशा भोसले एक महान गायिका तर आहेतच पण त्या उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहेत. त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची उत्तम नक्कल करतात.
24) आशा भोसले यांनी सुरुवातीला ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यासाठी इन्कार केला होता. त्यांना वेस्टर्न पॅटर्नचं गाणं गाण्यासाठी कठीण वाटत होतं.
25) आशा भोसले या पहिल्याच अशा गायिका आहेत, ज्यांना उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अलबमसाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या
मला विष पाजलं होतं, गानकोकिळेचा गौप्यस्फोट
'सुन रहा है ना तू' गाणाऱ्या अंध टुम्पाच्या पाठीवर हरिहरन यांचा हात
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी
लतादीदींकडून बाबासाहेब पुरंदरेंना सोन्याचं वळं भेट